news
Home पिंपरी चिंचवड ‘नाशिक टू पिंपरी-चिंचवड’ लुटमारीचा खेळ संपला! ५०० कॅमेरे आणि १०० तासांच्या थरारानंतर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

‘नाशिक टू पिंपरी-चिंचवड’ लुटमारीचा खेळ संपला! ५०० कॅमेरे आणि १०० तासांच्या थरारानंतर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

अक्षय बोरकर आणि प्रशांत यादव या सराईत गुन्हेगारांना नाशिकमधून बेड्या; चिखली व संत तुकाराम नगरमधील जबरी चोऱ्यांचे गुन्हे उघड. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

नाशिकहून येऊन पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांना लुटणारे सराईत चोरटे गजाआड; ५०० सीसीटीव्ही आणि १०० तासांच्या तपासाअंती गुन्हे शाखेची मोठी कारवाई


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ५ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड/नाशिक : पिंपरी-चिंचवड शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने खेचणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा गुन्हे शाखा युनिट १ ने पर्दाफाश केला आहे. नाशिकहून दुचाकीवर येऊन भरदिवसा चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचे १०० टक्के सोने हस्तगत करण्यात आले आहे. तब्बल ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि १०० तासांच्या तांत्रिक विश्लेषणानंतर पोलिसांनी या आरोपींना नाशिकच्या ग्रामीण भागातून ताब्यात घेतले.

शहरात वाढत्या चैन स्नॅचिंगच्या घटनांमुळे गुन्हे शाखेने विशेष पथक तैनात केले होते. पोलीस हवालदार महादेव जावळे यांनी आपल्या तांत्रिक कौशल्याचा वापर करून चिखली आणि संत तुकाराम नगर परिसरातील गुन्ह्यांचा माग काढला. आरोपी हे मुख्य रस्ते टाळून वारंवार रस्ते बदलून आडमार्गाने पळत होते. मात्र, पोलिसांनी पिंपरी-चिंचवडपासून ते पुणे ग्रामीण हद्दीतील ५०० पेक्षा जास्त कॅमेऱ्यांची पडताळणी करून आरोपींचे नाशिकमधील लोकेशन शोधून काढले.

१) अक्षय सुनील बोरकर (वय २१, रा. सातपूर, नाशिक)

२) प्रशांत संतविजय यादव (वय १९, रा. गंगापूर, नाशिक)

या दोघांना पोलिसांनी नाशिकमध्ये जाऊन अटक केली. प्राथमिक चौकशीत त्यांनी संत तुकाराम नगर आणि चिखली परिसरात केलेल्या दोन जबरी चोऱ्यांची कबुली दिली आहे. या दोघांवर नाशिक ग्रामीण हद्दीत २५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी या कारवाईत चोरीला गेलेले १०० टक्के सोने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकूण ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे संत तुकाराम नगर पोलीस ठाणे (गु.र. क्र. १६/२०२५) आणि चिखली पोलीस ठाणे (गु.र. क्र. १९/२०२५) येथील दोन महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सपोनि दत्तात्रय गुळीग, पोउनि कर्मराज गावडे आणि पथकातील अंमलदार महादेव जावळे, जयवंत राऊत, देवा राऊत व इतर सहकाऱ्यांचा समावेश होता.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!