शिवचरित्र संकटे दूर करत नाही, तर संकटांना भिडायला शिकवते! शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांनी उलगडले ‘शिवतंत्र’; संभाजीनगरमध्ये शिवविचारांचा जागर
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २२ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याचे दर्शन घडते. शिवचरित्र वाचल्याने संकटे दूर होत नाहीत, परंतु त्या संकटांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना कसे सामोरे जायचे आणि त्यावर मात कशी करायची, हे शिवचरित्र आपल्याला शिकवते,” असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत चिंचवडमधील संभाजीनगर येथे ‘यशाचा नवा मंत्र – शिवतंत्र’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. तनपुरे यांनी शिवरायांच्या जीवनकार्यातील व्यवस्थापन आणि दूरदृष्टीचे पैलू प्रभावीपणे मांडले.
डॉ. तनपुरे यांनी आपल्या व्याख्यानात वेळेच्या महत्त्वावर विशेष भर दिला. एका सेकंदाचेही जीवनातील मूल्य किती मोठे असते, हे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, वेळेचे योग्य नियोजन आणि काटेकोर वापर केल्यास यश निश्चित मिळते. “माणूस किती वर्षे जगला यापेक्षा तो कसा जगला, याला अधिक महत्त्व आहे,” असे सांगत त्यांनी तरुणांना धाडसाने कार्य करण्याची प्रेरणा दिली. तसेच, जीवनात योग्य गुरूचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचा सन्मान राखणे हीच यशाची पहिली पायरी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रबोधन पर्व राबविले जात आहे. या व्याख्यान प्रसंगी माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक कुशाग्र कदम, महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्याख्यानाचा समारोप डॉ. तनपुरे यांनी अत्यंत प्रेरणादायी पोवाड्याने केला, ज्यामुळे उपस्थित शिवप्रेमींमध्ये वीरश्री संचारली होती. या कार्यक्रमासाठी साई किरण मित्र मंडळाचे विशेष सहकार्य लाभले. मंडळाचे अध्यक्ष विशाल नारखेडे, उपाध्यक्ष अजित कोडलकर, गिरीश तेलंग, कार्याध्यक्ष संजय कलागते, खजिनदार निलेश नारखेडे आणि मंगेश गुंजाळ यांनी नियोजनासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


