news
Home पिंपरी चिंचवड कुणाल वाव्हळकरच पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष; आरपीआयच्या जिल्हा कार्यकारिणीत मोठा निर्णय

कुणाल वाव्हळकरच पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष; आरपीआयच्या जिल्हा कार्यकारिणीत मोठा निर्णय

चंद्रकांता सोनकांबळे यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये RPI आठवले गटाची महत्त्वाची बैठक; कुणाल वाव्हळकर यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दिनांक: ३१ मार्च २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उत्साहपूर्ण बैठक पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या परिसरात पार पडली. या बैठकीत पक्षांतर्गत सुरू असलेल्या शहराध्यक्ष पदाच्या चर्चांना पूर्णविराम देत, विद्यमान शहराध्यक्ष तथा नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बैठकीदरम्यान शहराध्यक्ष पदाबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, “शहराध्यक्ष बदलण्याचा अधिकार हा केवळ राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाच आहे. याबाबत स्वतः आठवले साहेबांशी चर्चा झाली असून, सध्या कोणताही बदल प्रस्तावित नाही.”

तसेच, सम्राट जकाते यांनीही या निर्णयाला दुजोरा दिला. कुणाल वाव्हळकर यांची निवड थेट राष्ट्रीय स्तरावरून करण्यात आली असल्याने, राज्य किंवा जिल्हा कार्यकारिणीला त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

बैठकीत वक्त्यांनी वाव्हळकर यांच्या कार्यकाळातील यशाचा आढावा घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विधानसभा, लोकसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये मित्रपक्षांना लाभदायक ठरणारे निर्णय घेतले. यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाला उल्लेखनीय यश मिळाले असून आगामी काळात RPI आठवले गट अधिक ताकदीने उभा राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना गटबाजी टाळून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. “पक्षाची शक्ती वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन रामदास आठवले यांचे हात बळकट करावेत,” असे ते म्हणाले. या बैठकीत शहर कार्यकारिणीतील काही नवीन पदनियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या.

या प्रसंगी उपाध्यक्ष तथा नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख, युवक अध्यक्ष धम्मरत्न गायकवाड, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विनोद चांदमारे, महिला प्रदेश सचिव ईला ठोसर, आणि सिकंदर सुरवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद चांदमारे यांनी केले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!