अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’चा धडाका! अवैध डिझेल साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त
अकोला / मुर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ४ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
अकोला: अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोलंबी शिवार येथे सुरू असलेल्या अवैध डिझेल साठ्यावर छापा टाकून पोलिसांनी ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, स्थानिक गुन्हे शाखा आणि तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकाने ३ एप्रिल २०२६ रोजी ही कारवाई केली. कोलंबी शिवार परिसरात अवैधरित्या डिझेलचा साठा करून विक्री केली जात असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पुरवठा अधिकारी विश्वजीत लिंगायत यांच्या सहकार्याने पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान शेख मोहम्मद शेख इब्राहिम (वय २५ वर्षे, रा. कुरणखेड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या ताब्यातून विनापरवाना साठवलेले खालील साहित्य जप्त करण्यात आले:
-
७५० लिटर डिझेल (५ निळ्या रंगाच्या टाक्या) – किंमत अंदाजे ६७,५००/- रुपये
-
७ रिकाम्या प्लास्टिक टाक्या – किंमत अंदाजे ३,५००/- रुपये
-
एकूण जप्त मुद्देमाल – ७१,०००/- रुपये
सदर आरोपीविरुद्ध बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पीएसआय विष्णू बोडखे, जीपीएसआय बोरकर, गोकुळ चव्हाण, स्वप्निल खेडकर, अन्सार शेख, मनीष ठाकरे तसेच तहसील कार्यालयाचे विश्वजीत लिंगायत, तुषार चिंचोळे, देवांशिव चांदोरकर आणि अतुल कोनापटे यांचा समावेश होता.
अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

