अकोल्यात खळबळ: अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला; पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन
अकोला प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ८ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
अकोला: अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात एका अनोळखी महिलेचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत प्रेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयांतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने या मृतकाची ओळख पटवण्यासाठी शोध पत्रिका जारी केली असून नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डाबकी रोडवरील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ असलेल्या ‘फर्स्ट चॉइस गॅरेज’च्या मागील मोकळ्या मैदानात ही घटना उघडकीस आली. ६ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास एक तरुण पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी या मैदानावर गेला असता, त्याला तिथे एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह दिसून आला. या तरुणाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. फिर्यादीच्या जबानीवरून डाबकी रोड पोलीस ठाण्यात मर्ग क्र. २३/२६ कलम १९६ बी.एन.एस.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतक महिलेचे वर्णन:
-
वय: अंदाजे ३० ते ३२ वर्षे.
-
उंची: ५ फूट.
-
रंग: गोरा.
-
केस: लांब आणि काळे.
-
कपडे: अंगात गुलाबी रंगाचे अंतर्वस्त्र आणि गुलाबी, पांढऱ्या व काळ्या रंगाचे रंगीबेरंगी फुलं असलेला जळालेला गाऊन.
या महिलेबाबत कोणालाही काही माहिती असल्यास किंवा आपल्या पोलीस स्टेशन परिसरातून कोणी बेपत्ता (Missing) असल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपर्क क्रमांक:
-
पो. नि. शंकर शेळके: ९९२१०३८१११
-
पो. हवा. अब्दुल माजीद: ८८८८०८५२२२
स्थानिक गुन्हे शाखा, अकोला या प्रकरणाचा अधिक तपास करत असून महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

