दापोडीत महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून भव्य आरोग्य शिबीर; उपमहापौर परशुराम वाडेकर जुन्या आठवणींनी झाले भावूक
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी मनोज प्रधान, १२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
दापोडी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त, दापोडी येथील राहुल मित्र मंडळाच्या वतीने आज (दि. १२) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सांगवी येथील रेणुकाई नॅचरोपॅथी वेलनेस केअर सेंटरच्या डॉ. धनश्री बोरगावे आणि मॅक्स मंथन डेली न्यूजचे पत्रकार मनोज/लक्ष्मण प्रधान यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
या शिबिराला दापोडीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, सुमारे १५० हून अधिक जणांनी आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करून घेतली.
शिबिरामध्ये डी.वाय. पाटील हॉस्पिटलचे रोबोटिक सर्जन डॉ. मनोजकुमार मस्तुद, सांगवी येथील डेंटिस्ट डॉ. सुचेता गायकवाड आणि विविध फिजिओथेरपिस्टनी सहभाग नोंदवून नागरिकांना मार्गदर्शन केले. यामध्ये ‘फुल बॉडी चेकअप’ आणि डेंटल चेकअपसह अनेक महत्त्वाच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या.
शिबिराला पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक संजयनाना काटे आणि ॲड. वंदना गायकवाड यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी मनोगत व्यक्त करताना उपमहापौर परशुराम वाडेकर अत्यंत भावूक झाले. त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील सामाजिक कार्याची आणि भीमजयंती साजरी करण्याची सुरुवात याच राहुल मित्र मंडळाच्या माध्यमातून केली होती. जुन्या आठवणींना उजाळा मिळताच त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळ्यांच्या कडा पाणावल्या. भावनांच्या आवेगामुळे त्यांना पुढील भाषण करणे कठीण झाले, त्यांनी दिलगिरी व्यक्त करत भाषण थांबवले. हा प्रसंग पाहून उपस्थित डॉक्टर आणि नागरिकही भारावून गेले.
यावेळी राहुल मित्र मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व डॉक्टरांचा गुलाबपुष्प आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल मॅक्स मंथन डेली न्यूजचे वार्ताहर लक्ष्मण प्रधान यांचाही मंडळाच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष सुमित गायकवाड, उपाध्यक्ष अमात्य बाराथे, खजिनदार अनुराग ओव्हाळ, सोशल मीडिया प्रमुख प्रमोद रणपिसे, यश बाराथे आणि सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



