news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेत पारदर्शक कारभाराचा निर्धार! ५२ कोटींच्या बिलांवरून शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा विरोधकांवर पलटवार

पिंपरी-चिंचवड महापालिकेत पारदर्शक कारभाराचा निर्धार! ५२ कोटींच्या बिलांवरून शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा विरोधकांवर पलटवार

लेखा विभागातील अधिकाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप; प्रशासकीय शिस्त राखण्यासाठी भाजपा ठाम | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महापालिकेतील चुकीच्या कामांवर अंकुश हीच भाजपाची कार्यप्रणाली; ५२ कोटींच्या बिल प्रकरणावर शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केली भूमिका

 

 

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ५२ कोटी रुपयांच्या बिलांच्या अदायगीवरून सुरू असलेल्या वादावर भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. “महापालिकेतील चुकीच्या कामांना आळा घालणे आणि पारदर्शक कारभार करणे हीच भाजपाची कार्यप्रणाली आहे. शहरवासीयांनी भाजपावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही,” असे काटे यांनी स्पष्ट केले.

शत्रुघ्न काटे म्हणाले की, ५२ कोटी रुपयांची बिले लेखा विभागातील अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अदा केली आहेत. यामध्ये ठेकेदार किंवा नगरसेवक यांचा दोष नसून, संबंधित अधिकाऱ्याने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीच केला आहे. विधी व कायदा विभागानेही स्पष्ट केले आहे की, लेखा विभागाने अदा केलेल्या बिलांना स्थायी समिती आणि मुख्य सभेची मान्यता घेणे बंधनकारक आहे. या अभिप्रायामुळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्या चुकीच्या कामाचा पर्दाफाश झाला असून, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. केवळ भाजपा नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, शत्रुघ्न काटे यांनी यावर पलटवार करताना सांगितले की, “काही बिलांच्या उपसूचनांवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्याही सूचक-अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या आहेत. मग त्याची जबाबदारी त्या नगरसेवकांची आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. विरोधकांनी राजकीय उद्देशाने वातावरण निर्मिती करू नये.”


“महापालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपाने अर्थसंकल्पातील त्रुटी दूर करण्याला प्राधान्य दिले आहे. ५२ कोटींच्या नियमबाह्य बिल अदायगी प्रकरणी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठवून आम्ही चुकीच्या कामांना प्रतिबंध केला आहे. पिंपरी-चिंचवडकरांनी दिलेली जबाबदारी आम्ही सक्षमपणे आणि पारदर्शक कारभाराच्या भावनेतून पार पाडत आहोत.”

— शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

भाजपाच्या या भूमिकेमुळे महापालिका प्रशासनातील भ्रष्ट किंवा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वचक बसणार असल्याचे बोलले जात आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!