बेघर बांधवांच्या साक्षीने फुले-आंबेडकर विचारांचा जागर; बडनेऱ्यात महिलाशक्तीचा प्रेरणादायी उपक्रम
बडनेरा, १७ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
बडनेरा: येथील ‘आधार बेघर निवारा’ केंद्रात महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आधार संघाच्या वतीने समाजप्रबोधनात्मक प्रदर्शनी आणि अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बेघर बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडविले.
नवी वस्ती परिसरातील महिला बचत गट आणि विविध वस्तीस्तर संघांच्या महिलांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आधार बेघर निवारा केंद्राच्या संचालक ज्योतीताई राठोड होत्या.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे, पल्लवी ढोले आणि समुदाय संघटक प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी उपस्थितांना समता, शिक्षण, स्वाभिमान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले. महामानवांचे विचार केवळ वाचनात न ठेवता ते आचरणात आणणे हीच खरी जयंती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष प्रदर्शनी भरवण्यात आली होती. संगीता बरमैया यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर सादर केलेल्या गीताने उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी प्रामुख्याने छायाताई नारनवरे, कल्पनाताई हरणे, विजयाताई घोडेस्वार, नूतनताई वासनिक, छायाताई भटकर, अनुपमाताई गोंडाने, रेखा मुळे, सीमा मडामे आणि शिलाताई चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आधार संघाच्या सचिव सोनल जगदाळे यांनी केले, तर सूत्रसंचालन मनाली अभिजीत इंगळे यांनी प्रभावीपणे पार पाडले. आभार प्रदर्शन उमा इंगोले यांनी केले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कुंदा मेश्राम, किरण दुपारे, वंदना पवार, अंजली मोकाशे, रमा मोहोड, मोनाली सदावर्ते या सीआरपीएफ (CRP) सदस्यांसह आधार संघ व बचत गटातील महिलांनी अथक परिश्रम घेतले. उपस्थित महिलांनी यावेळी स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश घराघरात पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


