news
Home अकोला खळबळजनक! बालविवाह रोखणाऱ्या पथकावर २०० जणांच्या जमावाकडून दगडफेक; मूर्तिजापुरात तणाव

खळबळजनक! बालविवाह रोखणाऱ्या पथकावर २०० जणांच्या जमावाकडून दगडफेक; मूर्तिजापुरात तणाव

मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण नसल्याने कारवाई; 'ॲसेस टू जस्टीस' आणि प्रशासनाची धाडसी मोहीम | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मूर्तिजापुरात बालविवाह रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर दगडफेक; विरोधानंतरही विवाह रोखण्यात प्रशासनाला यश

अकोला/मुर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे , २१ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

मूर्तिजापूर: मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका २१ वर्षीय तरुणीचा अमरावती येथील २० वर्षीय तरुणासोबत होणारा बालविवाह रोखताना प्रशासकीय पथकाला भीषण विरोधाचा सामना करावा लागला. दोनशेहून अधिक लोकांनी पथकाला घेराव घालून दगडफेक केली, मात्र पोलिसांनी परिस्थिती हाताळत हा विवाह थांबविण्यात यश मिळवले आहे.

बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. या प्रकरणात वर (मुलगा) २० वर्षांचा असल्याने हा विवाह कायद्याने बालविवाह ठरत होता.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन आणि ‘ॲसेस टू जस्टीस’ (आय.एस.डब्ल्यू.एस.) अकोला यांच्या पथकाने पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले. यावेळी समुदायामध्ये शिक्षणाचा अभाव आणि बालविवाहाच्या परंपरेमुळे संतापलेल्या जमावाने पथकाला घेराव घातला. पथकावर दगडफेक करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. पथकावर दगडफेक होण्याची ही दुसरी घटना असून यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलीस पथकाने संयमाने पालकांची आणि समुदायाची समजूत काढली.

हे प्रकरण अकोला येथील बाल कल्याण समितीसमोर मांडण्यात आले. समितीच्या अध्यक्षा ॲड. अनिता गुरव आणि सदस्यांनी दोन्ही पक्षांची बैठक घेतली. यावेळी समुदायाने “शिक्षणाचा अभाव आणि सामाजिक रुढी-परंपरांमुळे आम्ही लग्न लावत होतो,” असे सांगितले. समितीने हा फौजदारी गुन्हा असल्याचे स्पष्ट करून मुलाचे वय २१ पूर्ण झाल्याशिवाय लग्न न करण्याचा कडक इशारा दिला.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांनी पालकांचे समुपदेशन करून बालविवाहाचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम समजावून सांगितले. अखेर “मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न लावणार नाही,” असे कायदेशीर हमीपत्र दोन्ही बाजूंच्या पालकांकडून लिहून घेण्यात आले. यावेळी पोलीस पाटील, सरपंच आणि अंगणवाडी सेविका यांना साक्षीदार म्हणून घेण्यात आले.

बालविवाहात सहभागी होणाऱ्यांना २ वर्षांचा तुरुंगवास आणि १ लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. नागरिकांनी अशा घटनांची माहिती १०९८ (चाईल्ड लाईन) किंवा ११२ (पोलीस मदत) वर द्यावी, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर आणि त्यांच्या पथकाने केले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!