प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पुनर्वापरासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “पिंपरी चिंचवड शहरात पर्यावरणपूरक सवयी रुजवण्यासाठी ‘बॉटल्स फॉर चेंज’ सारखे उपक्रम अत्यंत प्रभावी ठरत आहेत. प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, त्याचा पुनर्वापर आणि एकंदरीत पर्यावरण संवर्धनासाठी केवळ प्रशासन पुरेसे नाही, तर यात नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘बॉटल एक्सचेंज’ उपक्रमांतर्गत पुनर्चक्रित (Recycled) प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या बसण्याच्या बाकड्यांचे आणि कचरा संकलन डब्यांचे लोकार्पण महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिका मुख्यालय परिसरात हा कार्यक्रम पार पडला.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सन २०२५-२६ या वर्षात शहरातून तब्बल २१९ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला आहे. देशभरात या उपक्रमातून २८ हजार ६४५ टन प्लास्टिक पुनर्वापरासाठी पाठवण्यात आले असून, हा ‘बिस्लेरी हरित संकल्प’ अभियानाचा एक भाग आहे.
यावेळी प्लास्टिक कचरा संकलनात सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल शहरातील आठ शैक्षणिक संस्थांचा विशेष सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे लँडफिलमध्ये जाणारा कचरा कमी होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमास सह आयुक्त मनोज लोणकर, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, राजेश आगळे, सहायक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे तसेच बिसलेरीचे संचालक के. गणेश, पूजा शिंदे आणि आप्पासाहेब धनवे उपस्थित होते.
“शाश्वत आणि संसाधन-कार्यक्षम पिंपरी चिंचवड शहर उभारण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. प्लास्टिक कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन आणि पुनर्निर्मिती यावर भर देऊन आम्ही एक सक्षम प्रणाली उभारत आहोत. नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे उद्दिष्ट साध्य होईल.”
– डॉ. प्रदीप ठेंगल, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


