news
Home पिंपरी चिंचवड तुमच्या मालमत्तेचे बिल आता थेट दारात! महापालिकेकडून ‘सिद्धी’ ॲपद्वारे कर बिल वाटप सुरू

तुमच्या मालमत्तेचे बिल आता थेट दारात! महापालिकेकडून ‘सिद्धी’ ॲपद्वारे कर बिल वाटप सुरू

८ लाख मालमत्ताधारकांना मिळणार देयके; 'सिद्धी' ॲपमुळे वितरण प्रक्रिया होणार पारदर्शक | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून घरपोच मालमत्ता कर बिल वाटपाला सुरुवात; महिला बचत गटांकडे धुरा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २३ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने आर्थिक वर्ष २०२६–२७ साठी मालमत्ता कर बिलांचे घरपोच वाटप सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महिला सक्षमीकरणाला बळ देत महापालिकेने ही जबाबदारी महिला बचत गटांच्या ६०० हून अधिक महिलांकडे सोपवली आहे.

शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकापर्यंत बिल वेळेत पोहोचवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असून, नागरिकांनी बिल वाटपासाठी येणाऱ्या महिलांना सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सुमारे ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मिळकती आहेत. नवीन सर्वेक्षणात आढळलेल्या मिळकतींमुळे ही संख्या ८ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या सर्व मिळकतींना घरपोच बिल देण्यासाठी महापालिकेने महिला आर्थिक विकास महामंडळाची (माविम) मदत घेतली आहे. मागील तीन वर्षांपासून महिला बचत गटांनी ही जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली आहे.

यावर्षी वितरण प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी ‘सिद्धी’ ॲपचा वापर करण्यात येत आहे. या डिजिटल प्रणालीमुळे कोणत्या भागात किती बिलांचे वाटप झाले, याची माहिती प्रशासनाला रिअल-टाइम मिळणार आहे. बिलासोबतच थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्याबाबतची नोटीस देखील दिली जाणार आहे, जेणेकरून नागरिकांना जप्तीची कारवाई टाळून वेळेत कर भरता येईल.

बिल वाटप करताना महिला बचत गटांच्या प्रतिनिधी नागरिकांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, करासंदर्भातील सवलतींची माहिती देणे आणि शंकांचे निरसन करणे अशी कामेही करणार आहेत. या उपक्रमामुळे ‘सक्षम’ प्रकल्पांतर्गत महिलांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.


“महापालिका नागरिकेंद्री सेवेला प्राधान्य देत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून होणारे हे वाटप केवळ कर संकलनापुरती मर्यादित नसून महिला सक्षमीकरणाला चालना देणारे आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा.”

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

“तंत्रज्ञानाधिष्ठित सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. घरपोच बिल वितरणामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून महिलांना आर्थिक सक्षमीकरणाची संधी मिळत आहे.”

– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

“बिलांचे शंभर टक्के वितरण पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे. ‘सिद्धी’ ॲपमुळे प्रक्रिया पारदर्शक झाली आहे. नागरिकांनी थकबाकी असल्यास ती भरून उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा.”

– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!