‘माझे शहर, माझी जबाबदारी’; स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनोखा उपक्रम
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २३ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या “क” क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ६ पांडवनगर, भोसरी येथे “स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६” संदर्भात नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “माझे शहर, माझी जबाबदारी” या अभियानांतर्गत स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थित नागरिकांना स्वच्छतेची सामूहिक शपथ देण्यात आली.
शहराला स्वच्छतेच्या क्रमवारीत अग्रस्थानी नेण्यासाठी महापालिकेने आता जनचळवळ उभारण्यास सुरुवात केली असून, विविध स्तरांवर जनजागृती केली जात आहे.
या कार्यक्रमात नागरिकांनी अत्यंत उत्साहात ‘स्वच्छाग्रही’ बनण्याचा संकल्प केला. यामध्ये खालील महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता:
-
मी कचरा करणार नाही आणि माझा परिसर स्वच्छ ठेवेन.
-
प्लास्टिक ऐवजी केवळ कापडी पिशव्यांचाच वापर करेन.
-
घरातील ओला, सुका, घातक आणि सॅनिटरी कचरा वेगवेगळा करून घंटागाडीतच देईन.
-
पर्यावरणाचे रक्षण करेन आणि कुठेही थुंकणार नाही.
-
रस्त्यावर लघुशंका करणार नाही.
-
बॅनर, स्टिकर किंवा भिंतीवर बिल लावून शहर विद्रुप करणार नाही.
महापालिकेकडून केवळ चौक आणि रस्त्यांवरच नव्हे, तर भाजी मंडई, पथारी व्यावसायिक, बस स्थानके, शाळा आणि महाविद्यालयांमध्येही स्वच्छतेबाबत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
हा उपक्रम महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. यामध्ये सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे आणि क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांचा सक्रिय सहभाग आहे.
“स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ या भावनेतून नागरिकांनी पुढाकार घेतल्यास पिंपरी चिंचवड शहर निश्चितच स्वच्छ सर्वेक्षणात देशात अग्रस्थानी राहील. नागरिकांचा सक्रिय सहभागच या चळवळीला यशस्वी करेल.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
“स्वच्छतेचा संदेश कृतीतून रुजवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिकाधिक नागरिकांनी शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.”
– डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



