मैलापाणी प्रक्रिया न करता सोडणाऱ्या खासगी मैलाशुद्धीकरण केंद्रावर महापालिकेची कारवाई; ७० हजारांचा दंड वसूल
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २४ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया व्हावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत शहरातील खासगी मैलाशुद्धीकरण केंद्रांची (STP) झाडाझडती घेण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्यांकडून ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही तपासणी मोहीम १७ एप्रिल ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात आली. शहरात अनेक मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वतःचे मैलाशुद्धीकरण प्रकल्प असूनही ते योग्यरित्या चालवले जात नसल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २१ खासगी मैलाशुद्धीकरण केंद्रांची पाहणी करण्यात आली. या तपासणीचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत:
-
९ केंद्रे: पूर्ण क्षमतेने आणि नियमानुसार कार्यान्वित आढळली.
-
१२ केंद्रे: या केंद्रांमधून पूर्णतः किंवा अंशतः प्रक्रिया न केलेले मैलापाणी अनधिकृतपणे बाहेर सोडले जात असल्याचे निदर्शनास आले.
या १२ सोसायट्यांवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने तातडीने कारवाई करत दंडात्मक बडगा उगारला आहे.
ज्या सोसायट्यांनी अद्याप आपले मैलाशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित केलेले नाही, त्यांनी ते तात्काळ सुरू करून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर (Gardening/Flushing) करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे पालन न झाल्यास संबंधित सोसायट्यांचे नळ कनेक्शन खंडित करण्याची कडक कारवाई करण्याचा इशारा पर्यावरण विभागाने दिला आहे.
“मैलाशुद्धीकरण केंद्र असूनही प्रक्रिया न केलेले मैलापाणी बाहेर सोडणे ही गंभीर बाब आहे. पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या कोणत्याही घटकाबाबत तडजोड केली जाणार नाही. संबंधित सोसायट्यांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

