news
Home पुणे पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमध्ये फी परताव्याचा ‘निकाल’! एका विद्यार्थ्याच्या लढ्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचा महाविद्यालयावर धडक

पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमध्ये फी परताव्याचा ‘निकाल’! एका विद्यार्थ्याच्या लढ्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचा महाविद्यालयावर धडक

माजी विद्यार्थी मयूर गरूड यांना १.०४ लाख रुपये परत करण्याचे शिक्षण संचालनालयाचे आदेश | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आयएलएस (ILS) लॉ कॉलेजच्या शेकडो विद्यार्थ्यांची बेकायदेशीर फी परताव्यासाठी निदर्शने; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २४ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: पुण्यातील नामांकित इंडियन लॉ सोसायटीच्या (ILS) लॉ कॉलेजमध्ये ‘बेकायदेशीररीत्या वसूल केलेली फी’ परत मिळवण्यासाठी शेकडो आजी-माजी विद्यार्थ्यांनी २३ एप्रिल रोजी महाविद्यालयात एकत्रित येत अर्जाद्वारे मागणी केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि उच्च शिक्षण संचालनालयाच्या चौकशीनंतर एका माजी विद्यार्थ्याला फी परत मिळाल्याने आता सर्वच विद्यार्थ्यांकडून परताव्यासाठी दबाव वाढला आहे.

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मयूर गरूड यांनी माहिती अधिकारातून (RTI) मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे तक्रार केली होती की, महाविद्यालय प्रशासनाकडून ‘अमान्य’ शीर्षकांखाली बेकायदेशीर शुल्क वसूल केले जात आहे. या तक्रारीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने उच्च शिक्षण संचालनालयाला चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

चौकशीअंती, संचालनालयाने मयूर गरूड यांना १.०४ लाख रुपये परत करण्याचे आदेश महाविद्यालयाला दिले. विशेष म्हणजे, चौकशी समितीने असेही नमूद केले होते की, ज्या इतर विद्यार्थ्यांकडून अशाच प्रकारे शुल्क घेतले गेले आहे, त्यांनाही तो परतावा देणे योग्य ठरेल.

गरूड यांना न्याय मिळाल्यानंतर, गुरुवारी शेकडो आजी-माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयावर धाव घेतली. “जर एका विद्यार्थ्यासाठी फी बेकायदेशीर आहे, तर ती सर्वांसाठीच बेकायदेशीर ठरते,” असे म्हणत विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या फी परताव्याचे अर्ज सादर केले. यामुळे महाविद्यालय प्रशासनाची कोंडी झाली असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

या प्रकरणावर महाविद्यालयाची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता, ‘ई-मेलद्वारे उत्तर देऊ’ असे सांगण्यात आले. मात्र, अधिकृत उत्तर अद्याप प्राप्त झालेले नाही. तसेच प्रभारी प्राचार्य दीपा पातुरकर यांनीही या विषयावर मौन बाळगले असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पुण्यातील प्रतिष्ठित शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारे फी वसुलीचे प्रकरण समोर आल्याने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. आता महाविद्यालय प्रशासन इतर सर्व विद्यार्थ्यांची फी परत करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!