news
Home पिंपरी चिंचवड आमदार गायकवाडांच्या ‘राड्या’विरोधात पिंपरीत एल्गार! ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाच्या समर्थनार्थ काशिनाथ नखाते मैदानात

आमदार गायकवाडांच्या ‘राड्या’विरोधात पिंपरीत एल्गार! ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाच्या समर्थनार्थ काशिनाथ नखाते मैदानात

प्रकाशकांना दिलेल्या धमकीचा कष्टकरी संघर्ष महासंघाकडून निषेध; टवाळखोर वृत्तीवर कारवाईची मागणी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मुख्यमंत्र्यांनी आमदार गायकवाडांना लगाम घालावा; काशिनाथ नखाते आक्रमक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २४ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: आयुष्यभर कामगार, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढणारे कॉ. गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीचा पिंपरीत तीव्र निषेध करण्यात आला. कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज या पुस्तकाचे सार्वजनिक वितरण करून पुस्तकाचे समर्थन करण्यात आले आणि मुख्यमंत्र्यांनी अशा ‘टवाळखोर’ प्रवृत्तीच्या आमदारावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

आमदार गायकवाड यांनी प्रकाशकांना फोनवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे.

यावेळी बोलताना कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की, “आमदार संजय गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. कधी कॅन्टीनमधील कामगारांना मारहाण करणे, तर कधी दमदाटी करणे यातच त्यांना धन्यता वाटते. प्रकाशक आंबी हे ‘एकदा पुस्तक वाचा’ असे अत्यंत संयमाने सांगत असतानाही, त्यांना शिवीगाळ करणे हे संस्कृतीला धरून नाही. गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर या पुस्तकाची विक्रमी विक्री झाली असून ते विचार लोकांपर्यंत पोहोचत आहेत.”

नखाते यांनी पुढे ठणकावले की, गायकवाड हे विधानसभेचे सदस्य आहेत. जर त्यांना पुस्तकावर आक्षेप असेल तर त्यांनी रीतसर सभागृहात मागणी करायला हवी होती. मात्र, टवाळखोर मुलांसारखी भाषा वापरणे अत्यंत निंदनीय आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गायकवाडांच्या वागणुकीला लगाम घालावा, अशी मागणी त्यांनी केली.

या निषेध आंदोलनाप्रसंगी कष्टकरी संघर्ष महासंघाचे उपाध्यक्ष राजेश माने, सचिव तुषार घाटुळे, मनपा सदस्य राजू बिराजदार, राजेंद्र भंडारी, लाला राठोड, चंद्रकांत माळी, नितीन जाधव, सतीश जाधव, बाळू शेळवणे, सुनील वायकुळे, कैलास सोनटक्के, प्रकाश वारंग आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!