news
Home अकोला जनगणना २०२७ चे बिगुल वाजले! मूर्तिजापुरात ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू

जनगणना २०२७ चे बिगुल वाजले! मूर्तिजापुरात ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू

१ मे पासून डिजिटल क्रांती; 'स्व-गणने'तून नागरिकांना स्वतःची माहिती नोंदवण्याचे प्रशासनाचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

जनगणनेचा महायज्ञ: मूर्तिजापुरात प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण उत्साहात संपन्न

अकोला/मुर्तिजापूर, प्रतिनिधी विलास सावळे, २३ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

मूर्तिजापूर: देशाच्या भविष्यातील नियोजनाचा पाया असलेल्या ‘जनगणना २०२७’ अंतर्गत महाराष्ट्र राज्यात लवकरच घरसूची आणि गृहगणनेचा बिगुल वाजणार आहे. या मोहिमेची पूर्वतयारी म्हणून मूर्तिजापूर तालुक्यातील नियुक्त पर्यवेक्षक आणि प्रगणकांच्या प्रथम टप्प्यातील प्रशिक्षणाचे उद्घाटन आज, २३ एप्रिल रोजी भारतीय ज्ञानपीठ विद्यालय येथे पार पडले. उपविभागीय चार्ज अधिकारी श्री. संदिपकुमार अपार यांच्या हस्ते या सत्राचा शुभारंभ झाला.

जनगणना प्रक्रिया निर्दोष आणि पारदर्शक व्हावी, यासाठी मूर्तिजापूर ग्रामीण क्षेत्राकरिता २७१ प्रगणक आणि ५० पर्यवेक्षकांची फौज तैनात करण्यात आली आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात १०० कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या तांत्रिक बारकाव्यांचे मार्गदर्शन करण्यात आले. हे प्रशिक्षण तीन टप्प्यांत विभागलेले असून ७ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी तहसीलदार (ग्रामीण) श्रीमती शिल्पा बोबडे, नायब तहसीलदार श्री. रविंद्र राऊतश्री. दिनेश सोनोने उपस्थित होते.

यावेळच्या जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना आपली माहिती स्वतः ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात आली आहे. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत se.census.gov.in या पोर्टलवर जाऊन मोबाईल ओटीपीच्या साहाय्याने माहिती भरता येईल. माहिती सादर केल्यानंतर मिळणारा ‘SE ID’ नागरिकांनी जपून ठेवावा आणि प्रगणक घरी आल्यावर त्यांना तो द्यावा, जेणेकरून प्रक्रियेत सुलभता येईल.

येत्या १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरोघरी भेट देऊन प्रत्यक्ष ‘हाऊस लिस्टिंग’ करणार आहेत. जनगणना अधिनियम १९४८ नुसार नागरिकांना ३३ महत्त्वाचे प्रश्न विचारले जातील. यात प्रामुख्याने:

  • घराचे स्वरूप: बांधकामाचे साहित्य (भिंती, छप्पर, जमीन).

  • सुविधा: पिण्याचे पाणी, शौचालय, स्वयंपाकाचे इंधन.

  • मालमत्ता: इंटरनेट, लॅपटॉप, स्मार्ट फोन, वाहने.

  • इतर: मुख्य अन्नधान्य आणि संपर्क क्रमांक.


“जनगणना हा केवळ आकड्यांचा खेळ नसून देशाच्या विकासाचा आराखडा आहे. तालुक्यातील नागरिकांनी प्रगणकांना विचारलेल्या प्रश्नांची अचूक माहिती देऊन राष्ट्रकार्यात आपले योगदान द्यावे.”

– श्री. संदिपकुमार अपार, उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!