पिंपरी-चिंचवड आरोग्य विभागाला ‘घरघर’; नादुरुस्त घंटागाड्या आणि तुटलेल्या डस्टबिनमुळे शहरात कचऱ्याचे साम्राज्य
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, ६ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार सध्या कमालीचा विस्कळीत झाला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नादुरुस्त घंटागाड्या, फुटलेले डस्टबिन आणि कचरा संकलनातील नियोजनाचा अभाव यामुळे नागरिक संताप व्यक्त करत असून, जनसेवक सुहास कुदळे यांनी प्रशासनाच्या या ‘दळभद्री’ कारभारावर जोरदार टीका केली आहे.
आरोग्य विभागाने नव्याने खरेदी केलेल्या कचरा संकलक गाड्यांच्या रचनेबाबत नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या गाड्यांची उंची अवाजवी असून, कचरा टाकण्यासाठी तो सात ते आठ फूट उंचीवर टाकावा लागतो. साधारणतः महिलांची उंची पाच फूट पाच इंच असताना, इतक्या उंचावर हात करून कचरा टाकणे कठीण होत आहे. परिणामी, निम्मा कचरा गाडीत जातो तर निम्मा बाहेर रस्त्यावर सांडतो, ज्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. “या गाड्या नक्की कोणाचे खिसे भरण्यासाठी घेतल्या आहेत?” असा तिखट सवाल आता नागरिक विचारत आहेत.
मागच्याच महिन्यात पालिकेच्या भांडार विभागात हजारो डस्टबिन पडून असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती, तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही. पिंपरी गावातील साफसफाई कर्मचाऱ्यांना नादुरुस्त ढकलगाड्या आणि फुटलेले डबे दिले जात आहेत. कचरा भरण्यासाठी डबे नसल्याने आरोग्य निरीक्षक आणि मुकादम कर्मचाऱ्यांना चक्क ‘पोत्यात’ कचरा भरण्यास सांगत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
प्रशासकीय राजवटीत झालेल्या या चुकीच्या खरेदी आणि नियोजनाचा फटका आता नवनिर्वाचित नगरसेवकांना बसत आहे. नागरिक आपल्या भागातील समस्यांबाबत लोकप्रतिनिधींना जाब विचारत आहेत. प्रशासनाने केलेल्या चुकांची सजा आम्हाला का? असा सूर आता नगरसेवकांमध्ये उमटत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना आरोग्य विषयक माहिती घेण्यासाठी वेळ नाही का? असा प्रश्न सुहास कुदळे यांनी उपस्थित केला आहे. शहरात जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग आणि नादुरुस्त यंत्रणा त्वरित सुधारावी, अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

