काळेवाडीतील चिमुरडीवर अत्याचार; गुन्हेगाराला काही तासांत बेड्या, तरीही पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा लोकप्रतिनिधींचा प्रयत्न
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ६ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: काळेवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेत पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला काही तासांतच अटक केली आहे. मात्र, या प्रकरणाचे भांडवल करत काही लोकप्रतिनिधींनी पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर काळेवाडी पोलिसांनी अधिकृत माहिती देऊन वस्तुस्थिती मांडली आहे.
१४ एप्रिल २०२६ रोजी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाकडून काळेवाडी पोलिसांना एमएलसी क्र. २७८१/२०२६ अन्वये माहिती प्राप्त झाली. एका चिमुरडीला आंबा देण्याचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवला आणि सकाळी १०:३१ वाजता भा.न्या.सं. कलम ६४(२)(m), ६५(२) सह पोक्सो कायदा कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा (रजि. नं. १५९/२०२४) दाखल केला.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने अवघ्या काही तासांतच आरोपी विजय पोपट भोसले (वय ४७, रा. नढेनगर, काळेवाडी) याला शोधून काढले. भोसरी उड्डाणपुलाखालून त्याला सायंकाळी १७:०२ वाजता अटक करण्यात आली.
घटनेच्या दिवशीच आरोपी जेरबंद झालेला असताना आणि ही बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर तीन दिवसांनी काळेवाडीतील एका लोकप्रतिनिधींनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले होते. मात्र, काल ५ मे २०२६ रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप प्रसारित करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक बहिराट यांनी गुन्हा दाखल करताना ‘साक्षीदार आणा’ अशी मागणी केली आणि अरेरावीची भाषा वापरली, असा दावा करण्यात आला आहे.
पोलिस प्रशासनाने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. “आरोपीला घटनेच्या दिवशीच अटक केलेली असताना, केवळ स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि पोलीस दलासह गृहविभागाची प्रतिमा मलिन करण्याच्या आकस बुद्धीने ही क्लिप प्रसारित करण्यात आली आहे,” असे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून दोषारोपपत्र पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
