news
Home पिंपरी चिंचवड शिवसेनेचा (UBT) महापालिकेतील भ्रष्टाचारावर एल्गार! चेतन पवार यांचा ‘बी’ टीमवरून विरोधकांवर निशाणा

शिवसेनेचा (UBT) महापालिकेतील भ्रष्टाचारावर एल्गार! चेतन पवार यांचा ‘बी’ टीमवरून विरोधकांवर निशाणा

महानगरपालिकेच्या ५२ कोटींच्या भ्रष्टाचाराविरोधात न्यायालयात जाणार; लवकरच नवीन शहर कार्यकारणी जाहीर करणार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

विरोधी पक्ष ही भाजपची “बी” टीम; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहराध्यक्ष चेतन पवार यांची घणाघाती टीका

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ७ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्ष आपली सक्षम भूमिका बजावण्यात अपयशी ठरला आहे. राज्यातील सत्तेत हे पक्ष भाजपसोबत सहभागी असल्याने स्थानिक पातळीवर ते भाजपची ‘बी’ टीम म्हणून काम करत आहेत,” अशी कडक टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवनियुक्त शहराध्यक्ष चेतन पवार यांनी केली.

बुधवारी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, कैलास नेवासकर, तुषार नवले, अमोल निकम, ज्ञानेश्वर शिंदे, राजाराम कुदळे, अनिता तुतारे, वैभवी घोडके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

चेतन पवार यांनी महानगरपालिकेच्या कारभारावर बोट ठेवताना सांगितले की, “तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यकाळात महापालिकेला कर्जबाजारी करण्याचे काम झाले आहे. नुकत्याच समोर आलेल्या ५२ कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराची सखोल माहिती घेऊन शिवसेना न्यायालयात दाद मागेल. महापालिकेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व नसले तरी, भ्रष्टाचारावर लक्ष ठेवण्यासाठी पक्षाचे एक स्वतंत्र प्रतिनिधी मंडळ नेमण्यात येईल.”

पत्रकार परिषदेपूर्वी, चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात निदर्शने करण्यात आली. पुणे येथील नसरापूर आणि सहकारनगरमधील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार घटनेचा शिवसेनेने तीव्र निषेध केला. या घटनांची नैतिक जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच भाजप आमदार चित्रा वाघ यांच्या वक्तव्याचाही निषेध करण्यात आला.

“पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो मी सार्थ ठरवेन. आगामी काळात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील जुन्या-नव्या शिवसैनिकांना एकत्र घेऊन समन्वय साधला जाईल. लवकरच समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देणारी नवीन शहर कार्यकारणी जाहीर केली जाईल,” असेही पवार यांनी स्पष्ट केले.

शहरातील पाणी, वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर शिवसेना आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असून भाजप आणि विरोधी पक्षांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!