व्यावसायिक गॅस दरवाढ नव्हे, ही तर खाद्यपदार्थांच्या दरवाढीची सुरुवात; काशिनाथ नखाते यांचा सरकारवर प्रहार
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , ७ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक महागाईच्या खाईत लोटला गेला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ९९३ रुपयांनी झालेली मोठी वाढ ही केवळ गॅस दरवाढ नसून, ती सामान्य जनतेच्या ताटातील खाद्यपदार्थांच्या दरवाढीची सुरुवात आहे,” अशी घणाघाती टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
व्यावसायिक गॅसच्या या अवाढव्य दरवाढीचा निषेध करण्यासाठी ‘कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र’च्या वतीने चिखली येथील थरमॅक्स चौकात कामगारांनी एकत्र येत सरकारला जाब विचारला.
यावेळी बोलताना काशिनाथ नखाते म्हणाले की, देशभरात महागाईचा भडका उडालेला असताना सरकार वारंवार दरवाढ करून जखमेवर मीठ चोळत आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८१% दरवाढ करण्यात आली असून, फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत १३८० रुपयांनी दर वाढले आहेत. या दरवाढीचा थेट फटका विद्यार्थी, कामगार, छोटे दुकानदार आणि मध्यमवर्गीयांना बसत आहे.
दरवाढीमुळे छोटे हॉटेल व्यावसायिक, कॅन्टीन चालक आणि स्टॉल धारक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. नखाते यांनी मांडलेल्या काही महत्त्वाच्या बाबी:
खाद्यपदार्थांचे दर वाढवले तर ग्राहक कमी होण्याची भीती आहे आणि न वाढवल्यास व्यवसाय तोट्यात जाऊन बंद पडण्याची वेळ येईल. एकीकडे जीएसटीचा जाच आणि दुसरीकडे गॅसची महागाई अशा दुहेरी संकटात छोटे व्यावसायिक भरडले जात आहेत. महागाईने सामान्य कष्टकऱ्यांचे कंबरडे मोडले असून कुटुंबाचा गाडा चालवणे कठीण झाले आहे.
सामान्य नागरिकांना आणि छोट्या व्यावसायिकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा. महागाई नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करून गॅस दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
