news
Home पिंपरी चिंचवड भोसरीत रंगणार कबड्डीचा महाकुंभ! महापौर चषक राज्यस्तरीय स्पर्धेचे शानदार उद्घाटन

भोसरीत रंगणार कबड्डीचा महाकुंभ! महापौर चषक राज्यस्तरीय स्पर्धेचे शानदार उद्घाटन

१७ लाख ५० हजारांची पारितोषिके; ६० संघांमधील खेळाडूंची मातीतली झुंज पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची गर्दी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

युवा खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध — महापौर रवि लांडगे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ७ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “कबड्डी हा आपल्या मातीतला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडलेला खेळ आहे. ग्रामीण भागातील प्रतिभेला संधी देणे आणि युवा खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे हाच महापौर चषक स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. क्रीडा क्षेत्रात पिंपरी-चिंचवड शहराचा दबदबा निर्माण करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरी येथील गावजत्रा मैदानात आयोजित ‘महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६’ चे उद्घाटन महापौर लांडगे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या सोहळ्याला आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, पीएमपीएल अध्यक्ष डॉ. महेश आव्हाड, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, नगरसदस्य योगेश लांडगे, कुंदन गायकवाड, उपायुक्त पंकज पाटील आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

 ही स्पर्धा १० मे २०२६ पर्यंत चालणार आहे. राज्यभरातील ३६ पुरुष आणि २४ महिला संघांतील एकूण ८१२ खेळाडूंचा सहभाग. सामने शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी ५५ अनुभवी सामनाधिकारी कार्यरत आहेत. या स्पर्धेतील बक्षिसांची रक्कम एकूण १७ लाख ५० हजार रुपये इतकी असून, ती खालीलप्रमाणे विभागली आहे:

  • प्रथम क्रमांक: २ लाख रुपये (पुरुष व महिला गट स्वतंत्र).

  • द्वितीय क्रमांक: १ लाख ५० हजार रुपये.

  • तृतीय व चतुर्थ क्रमांक: प्रत्येकी १ लाख रुपये.

  • वैयक्तिक पुरस्कार: उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि अष्टपैलू खेळाडूंना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

आमदार महेश लांडगे यांनी नमूद केले की, अशा स्पर्धांमुळे शहरातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट होईल, तर आमदार शंकर जगताप यांनी तरुणांना खेळाकडे करिअर म्हणून पाहण्याचे आवाहन केले. या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे शहरात सध्या क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!