रक्षक चौक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात; औंध ते किवळे प्रवास लवकरच होणार सिग्नलमुक्त
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, ७ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपळे निलख येथील रक्षक चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम आता पूर्णत्वाच्या टप्प्यावर आले आहे. या पुलामुळे औंध ते सांगवी फाटा आणि रावेतपासून पुढे किवळेपर्यंतचा प्रवास लवकरच सिग्नलमुक्त आणि वाहतूककोंडीमुक्त होणार आहे. चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची नुकतीच पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे गुरव येथील जनसंपर्क कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही पार पडली. यावेळी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रकल्पाच्या प्रगतीची सविस्तर माहिती दिली.
रक्षक चौक हा शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत कळीचा टप्पा मानला जातो. या पार्श्वभूमीवर झालेल्या पाहणी दौऱ्यात काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले:
पुलाच्या कामासह संलग्न असलेल्या बीआरटी बस वाहतुकीचे नियोजन करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पुलाचे रेलिंग आणि संपूर्ण कामाचे तातडीने ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या उड्डाणपुलामुळे नागरिकांच्या वेळेची आणि इंधनाची मोठी बचत होणार असून, सांगवी-किवळे या संपूर्ण बीआरटी मार्गावरील वाहतूक अधिक वेगवान होणार आहे.
या प्रकल्पाच्या पाहणीवेळी नगरसेविका आरती चोंधे, नगरसेविका स्नेहा कलाटे, महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सामाजिक कार्यकर्ते संकेत चोंधे, प्रसाद कस्पटे, सनी बारणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
“आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचा आढावा घेतला असून, हा पूल लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी सेफ्टी ऑडिटबाबत कडक सूचना दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवडच्या सुलभ वाहतुकीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
— अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


