news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी पालिकेत राष्ट्रवादीचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर! गणवेश वाटपाच्या शिफारसीवरून संशयाचे धुके

पिंपरी पालिकेत राष्ट्रवादीचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर! गणवेश वाटपाच्या शिफारसीवरून संशयाचे धुके

संदीप वाघेरेंचे बंड की भ्रष्टाचार उघड करण्याचा प्रयत्न? भाऊसाहेब भोईर यांच्या भूमिकेवर स्वपक्षीयांचीच नाराजी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड मनपा: शालेय गणवेश वाटपावरून राष्ट्रवादीत ‘ठिणगी’; विरोधी पक्षनेते आणि नगरसेवकांमध्ये जुंपली!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ८ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय साहित्यावरून सध्या पालिकेच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत असलेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, विरोधी पक्षनेते आणि नगरसेवकांमध्ये ‘क्रेडिट वॉर’ आणि संशयास्पद शिफारसींच्या चर्चांना उधाण आले आहे.

या प्रकरणाला वाचा फोडली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी. वाघेरे यांनी स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, शालेय गणवेश वाटपासंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर त्यांनी स्वाक्षरी केलेली नाही. जर कोणी त्यांच्या नावाचा किंवा स्वाक्षरीचा परस्पर गैरवापर केला असेल, तर संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संदीप वाघेरे हे नेहमी आपल्या मतदारांच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. महानगरपालिकेच्या कुठल्याही टक्केवारीच्या राजकारणात रस न दाखवता, करदात्या नागरिकांच्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा, हीच त्यांची भूमिका राहिली आहे. खऱ्या अर्थाने विरोधी पक्षनेते पदासाठी त्यांचे नाव चर्चेत असतानाही, वरिष्ठांच्या पातळीवर झालेल्या हालचालींमुळे ते मागे पडल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.

एकीकडे वाघेरे यांनी प्रस्तावापासून अंतर राखले असताना, दुसरीकडे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्तांना शिफारस पत्र देऊन नवीन वादाला तोंड फोडले आहे. भोईर यांनी सोलापूर येथील ‘श्री जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था’ या संस्थेला गणवेश वाटपाचे काम देण्याची शिफारस केली आहे. ही संस्था दिव्यांग आणि अपंगांसाठी कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केला असला, तरी या शिफारसीच्या वेळेवरून संशय व्यक्त केला जात आहे.

या घडामोडींमुळे पालिकेच्या वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. “विरोधी पक्षनेते हे सत्ताधाऱ्यांशी किंवा विशिष्ट संस्थांशी ‘मॅनेज’ झाले आहेत का?” असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात आहे. विशेष म्हणजे, आपल्या ज्येष्ठतेचा हवाला देऊन आपण स्वच्छ आहोत असा दावा करणारे नेते स्वपक्षीय नगरसेवकांना विश्वासात का घेत नाहीत, असा सवाल वाघेरे यांच्या भूमिकेनंतर उपस्थित झाला आहे.

येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी (२०२६-२७) बालवाडी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत साहित्य मिळणे आवश्यक आहे. मात्र, निविदा प्रक्रियेतील राजकीय हितसंबंध आणि संशयास्पद स्वाक्षऱ्यांच्या आरोपामुळे हा ‘गणवेशाचा खेळ’ आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याचा फटका गरीब विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, पालिका प्रशासन आता यावर काय निर्णय घेणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!