पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे स्पष्ट निर्देश
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , ८ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवून आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा. शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची ओळख करून तेथे कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करावीत,” असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृहात ही बैठक संपन्न झाली.
नदीकाठच्या व पाणी शिरण्याचा धोका असलेल्या पूरप्रवण भागांतील नागरिकांच्या स्थलांतराचे पूर्वनियोजन करावे. शाळा व निवारा केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा सज्ज ठेवाव्यात. शहरातील अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्ज तातडीने काढून टाकावीत. धोकादायक इमारतींची पाहणी करून संबंधितांना नोटिसा द्याव्यात आणि तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे. महापालिका रुग्णालयांमध्ये अखंडित विद्युत पुरवठा राहील याची खात्री करावी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी बेड्स राखीव ठेवावेत. पावसाळ्यात साथीचे रोग पसरू नयेत म्हणून नियमित निर्जंतुकीकरण व धुरीकरण करावे.आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, आरोग्य, विद्युत आणि उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ कार्यरत ठेवावी. रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवावेत. सीसीटीव्ही यंत्रणा तपासून नादुरुस्त कॅमेरे दुरुस्त करावेत आणि मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्षातून सातत्याने देखरेख ठेवावी.
मान्सूनपूर्व तयारीसोबतच आयुक्तांनी ‘अतिक्रमणमुक्त फुटपाथ’ पंधरवड्याचा आढावा घेतला. फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई करताना कोणालाही अभय देऊ नका, असे सांगत पादचारी मार्ग मोकळे ठेवण्याच्या कामात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिला.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी उपाययोजनांचे सादरीकरण केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

