news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये क्रीडा क्रांती! मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

पिंपरी-चिंचवडमध्ये क्रीडा क्रांती! मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

भोसरीच्या महापौर चषक स्पर्धेत रंगला क्रीडा जागर; भारताच्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी सक्षम पायाभरणी होत असल्याचा विश्वास | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ९ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “पिंपरी चिंचवड शहर क्रीडा क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून महापौर चषकासारख्या स्पर्धांमुळे राज्यातील युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळत आहे. अशा स्पर्धा केवळ खेळापुरत्या मर्यादित नसून, त्या खेळाडूंमध्ये शिस्त, नेतृत्व आणि संघभावना घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करतात,” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले. आपला देश क्रीडा क्षेत्रात घेतलेली भरारी पाहता, २०३६ पर्यंत भारत नक्कीच ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद यशस्वीपणे भूषवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी येथील गावजत्रा मैदानात आयोजित ‘महापौर चषक २०२६-२०२७’ राज्यस्तरीय स्पर्धेला मंत्री पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी खेळाडूंशी संवाद साधला आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा विशेष सत्कार केला.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतात २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या दृष्टीने देशभरात अत्याधुनिक क्रीडांगणे, प्रशिक्षण केंद्रे आणि आवश्यक सोयी-सुविधा उभारल्या जात आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध उपक्रमांमुळे खेळाडूंना आता जागतिक दर्जाचे वातावरण उपलब्ध होत असून, भारत त्या दिशेने सक्षम पायाभरणी करत आहे.

यावेळी विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला:

विजय यादव (बॉक्सिंग), मीनाक्षी शिंदे (सायकलिंग), वैष्णवी जगताप (पॅरा जलतरण), विराज लांडगे (कबड्डी)

या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, महिला बालकल्याण समिती सभापती राणीमाई पठारे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांनी भोसरी परिसरातील क्रीडा संस्कृती अधिक सक्षम करण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन भविष्यातही सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. महापौर रवि लांडगे यांनी शहरातील युवकांना दर्जेदार क्रीडा संधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!