अमरावतीत कडाक्याच्या उन्हात राबणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; सामाजिक कार्यकर्त्याचे आयुक्तांना साकडे
अमरावती प्रतिनिधी विलास सावळे, ९ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: अमरावती शहरात सध्या उन्हाळ्याची तीव्रता शिगेला पोहोचली असून तापमान ४५ अंश सेल्सियसच्या पार गेले आहे. अशा प्रखर उन्हात शहराचे आरोग्य सुरक्षित ठेवणाऱ्या सफाई कामगारांना किमान मूलभूत सुविधाही मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सागर दुर्योधन यांनी अमरावती महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, अनेक प्रभागांमध्ये जिथे ५० कामगारांची गरज आहे, तिथे केवळ २० कामगारांकडूनच संपूर्ण काम करून घेतले जात आहे. यामुळे कामगारांवर कामाचा प्रचंड ताण येत असून त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
सफाई कामगारांना कामाच्या दरम्यान खालील समस्यांना सामोरे जावे लागत आहे; हजेरी लावताना किंवा विश्रांती घेण्यासाठी शहरात कोठेही सावलीची व्यवस्था नाही.कडाक्याच्या उन्हात काम करताना शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. उन्हापासून संरक्षणासाठी आवश्यक असणारे साहित्य कामगारांकडे उपलब्ध नाही. उष्माघात टाळण्यासाठी कोणतीही आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात नाहीत.
१. सर्व प्रभागांत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून कामाचा ताण कमी करावा.
२. प्रत्येक प्रभागात सावली, पिण्याचे पाणी आणि विश्रांती केंद्राची व्यवस्था करावी.
३. उष्माघात प्रतिबंधासाठी तातडीने वैद्यकीय सुविधा सुरू कराव्यात.
४. कंत्राटी कामगारांच्या बाबतीत कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी.
“इतर शहरांतील नगरपालिकांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून कामगारांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, तशाच धर्तीवर अमरावती महानगरपालिकेनेही तातडीने निर्णय घ्यावा,” असे आवाहन सागर दुर्योधन यांनी केले आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि कामगार आयुक्तांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


