प्रशासनाचा अनाकलनीय कारभार! खासगी समितीला १ कोटींची खैरात, पण पालिकेच्या स्वतःच्या स्मारकाची मात्र दैना
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , १५ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मारकांबाबतच्या दुटप्पी धोरणामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. एका बाजूला पालिकेने एका ‘खासगी’ स्मारक समितीला (यशवंतराव चव्हाण स्मारक समिती) १ कोटी रुपयांचा भरघोस निधी बहाल केला आहे, तर दुसऱ्या बाजूला पालिकेने स्वतः उभारलेल्या महापुरुषांच्या स्मारकांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचे उघड झाले आहे.
महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते ‘यशवंतराव चव्हाण स्मारक समिती’ या खासगी संस्थेला १ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. मात्र, हेच औदार्य पालिकेने स्वतः उभारलेल्या पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाबाबत का दाखवले नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पालिकेच्या स्वतःच्या मालकीचे हे स्मारक सध्या कमालीच्या दुरवस्थेच्या गर्तेत असून, प्रशासनासाठी ही बाब अत्यंत लाजीरवाणी ठरत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी पुराव्यासह या स्मारकाची भीषण वास्तवता मांडली आहे. ज्या स्मारकाची जबाबदारी पूर्णपणे महानगरपालिकेची आहे, त्या ठिकाणी स्वच्छतेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. महिनाभर पुतळ्याच्या गळ्यातील हार तसेच सडत राहतात, पण ते काढण्याची साधी तसदीही आरोग्य विभाग घेत नाही. स्मारकावर चढण्यासाठी असलेला लोखंडी जिना इतका निकृष्ट दर्जाचा झाला आहे की तो कोणत्याही क्षणी कोसळून मोठा अपघात होऊ शकतो. स्मारकाच्या मागील सीमा भिंतीवर देखणे मुरल्स बसवण्याचे महापालिकेचे आश्वासन केवळ कागदावरच राहिले आहे.
“निधी खासगी समित्यांना द्यायचा आणि स्वतःची जबाबदारी असलेल्या स्मारकांना वाऱ्यावर सोडायचे, हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आणि महापुरुषांचा अपमान आहे. प्रशासनाने १ कोटींचा निधी देऊन स्वतःची पाठ थोपटून घेतली असली, तरी जमिनीवरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. पालिकेच्या स्मारकाची ही दुरवस्था म्हणजे शुद्ध धूळफेक आहे. जर तात्काळ या स्मारकाचा कायापालट झाला नाही, तर हा अन्याय सहन केला जाणार नाही.”
– प्रदीप गायकवाड, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) अर्बन सेल
प्रदीप गायकवाड यांनी या संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना ठणकावून जाब विचारला असून स्मारकाचे सुशोभीकरण करण्याची मागणी केली आहे. आता प्रश्न असा उरतो की, पालिकेचा हा १ कोटींचा निधी नक्की कोणाच्या हितासाठी वापरला जात आहे? खासगी समितीच्या की महापुरुषांच्या खऱ्या सन्मानासाठी?
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
