नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये ‘आरसीसी’च्या फलकाची तोडफोड!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, १९ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: ‘नीट-यूजी २०२६’ (NEET-UG 2026) वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता पिंपरी-चिंचवड शहरातही तीव्रतेने उमटू लागले आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि ‘आरसीसी’ (RCC) क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या संस्थेच्या फलकाची (बॅनर) संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार तोडफोड केली. संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आणि पेपरफुटीतील शिक्षण माफियांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनाप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतीश काळे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब गजधने, ब्रह्मानंद जाधव, प्रसाद दौंडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात ‘आरसीसी’ क्लासेसचे संस्थापक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मोटेगावकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोचिंग संस्थांपैकी एक असलेल्या आरसीसीचे प्रमुख असून, लातूर पॅटर्नमधील एक मोठे नाव म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावणाऱ्या या पेपरफुटीच्या गैरप्रकारात त्यांचे थेट नाव समोर आल्याने वैद्यकीय शिक्षणाची तयारी करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि निराशा व्यक्त होत आहे.
याच तीव्र भावनेतून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शहरातील आरसीसी संबंधित फलक आणि बोर्ड तोडून आपला निषेध नोंदवला. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षण माफियांना माफी नाही”, “शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाऱ्यांना तात्काळ फाशी द्या” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष सतीश काळे यांनी महायुती व केंद्र सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, “लाखो गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी दिवस-रात्र एक करून, प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देतात. मात्र, काही भ्रष्ट प्रवृत्ती केवळ पैशांच्या जोरावर पेपरफुटी करून या प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहेत. अशा शिक्षण क्षेत्रातील गुन्हेगारांचा जाहीर निषेध करण्यासाठीच हे आक्रमक आंदोलन करण्यात आले आहे.”
सीबीआयच्या चालू असलेल्या तपासात आरसीसी संस्थेशी संबंधित अनेक धक्कादायक आणि महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची चर्चा आहे. सीबीआयने मोटेगावकर यांच्या निवासस्थानी व विविध संस्थांमध्ये छापेमारी करून अनेक डिजिटल पुरावे आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.
नीट सारख्या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित परीक्षांमध्ये वारंवार होणाऱ्या या गंभीर गैरप्रकारांमुळे देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास ढासळत चालला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणाच्या मूळाशी जाऊन सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि शिक्षण क्षेत्र पारदर्शक करावे, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


