नक्की मलिदा खातोय कोण? मनपाचे वरिष्ठ अधिकारी अन् ठेकेदारांचे लागेबांधे? MNGL गॅस पाईपलाईन कामावरून पिंपरी-चिंचवडमध्ये संताप
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १९ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: “पिंपरी चिंचवड शहरात एमएनजीएल (MNGL) कंपनीमार्फत सुरू असलेल्या सीएनजी आणि पीएनजी गॅस पाईपलाईनच्या कामात मोठा सावळ्या गोंधळ सुरू आहे. महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांचे आर्थिक लागेबांधे आहेत की काय? नक्की मलिदा खातोय कोण?” असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. महानगरपालिका प्रशासनाची कोट्यवधी रुपयांची आवश्यक रक्कम जमा न करताच शहरातील विविध भागांमध्ये रस्ते खोदून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून याप्रकरणी भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पालिका आयुक्तांना निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली आहे.
पावसाळा तोंडावर आलेला असताना रस्ते खोदून ठेवल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यात वेळेतच लक्ष घालावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल आठ प्रभागांमध्ये सध्या एमएनजीएलकडून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नियमानुसार या खोदकामासाठी संबंधित कंपनीने महानगरपालिकेकडे सुमारे ९ कोटी ७२ लाख रुपयांची अनामत व शुल्क रक्कम जमा करणे कायदेशीररीत्या बंधनकारक होते. मात्र, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून संबंधित मोठी रक्कम जमा न करताच थेट रस्ते खोदण्यास सुरुवात करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप सचिन काळभोर यांनी निवेदनात केला आहे.
शहरातील अनेक मुख्य चौक आणि अंतर्गत भागांमध्ये रस्ते खोदून ते तसेच अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्ते अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी, धूळ आणि अस्वच्छतेच्या समस्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पादचारी, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अपघातांचा धोका कमालीचा वाढला आहे. काही दिवसांवर पावसाळा आला असताना ही कामे अशीच राहिली तर शहरात गंभीर पूरस्थिती आणि वाहतुकीचा बोजवारा उडण्याची दाट शक्यता आहे.
सचिन काळभोर यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “महानगरपालिका प्रशासनाचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. एमएनजीएल कंपनीने तातडीने ९ कोटी ७२ लाख रुपयांची थकीत रक्कम महानगरपालिकेकडे जमा करावी. तोपर्यंत हे सुरू असलेले गॅस पाईपलाईनचे काम तत्काळ प्रभावाने बंद करण्यात यावे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित ठेकेदार आणि कंपनीवर कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.”
शहरातील नागरिकांना होणारा मानसिक व शारीरिक त्रास लक्षात घेता पावसाळ्यापूर्वी ही सर्व खोदेलेली कामे दर्जेदारपणे पूर्ण करून रस्ते पूर्ववत करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. आता या कोट्यवधींच्या कथित मलिदा प्रकरणाकडे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी कसे पाहतात आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
