मोटेगावकरांच्या पिंपरी शाखेतील कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा – काशिनाथ नखाते
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , १९ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “‘आरसीसी’ (RCC) क्लासेसचा संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याला नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने (CBI) अटक केल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील मोठा काळा चेहरा समोर आला आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे पिंपरी-चिंचवड शहरातही पसरलेले असून, येथील ‘आरसीसी’ शाखेतील कर्मचारी आणि प्राध्यापकांचाही या फसवणुकीत थेट सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या सर्व स्थानिक संशयित कर्मचाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत,” अशी जोरदार मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष व कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
या संदर्भात काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर मागणीचे निवेदन सुपूर्द केले.
काशिनाथ नखाते यांनी निवेदनात म्हटले आहे की, नीट परीक्षेतील या महाघोटाळ्यात पिंपरी येथील ‘आरसीसी’ कार्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग नाकारता येत नाही. लातूर पॅटर्नच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडमधील शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेऊन त्यांच्या पालकांकडून लाखो रुपयांची लूट करण्यात आली आहे का? पैशांच्या बदल्यात पेपर पुरवण्याचे आमिष येथील कार्यालयातून दाखवले गेले होते का? याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. पोलिसांनी पिंपरी शाखेचे सर्व रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहार तपासावेत, अशी मागणी त्यांनी केली.
“शिक्षण हे समाज परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार, फसवणूक किंवा पेपरफुटीसारख्या गंभीर आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकारांना कायद्यात कोणतीही माफी मिळता कामा नये. लाखो विद्यार्थी रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात. अशा प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि पालकांच्या कष्टाच्या पैशांवर जे कोणी डल्ला मारत असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असे नखाते यांनी स्पष्ट केले.
यासह, पुढील एका महिन्याच्या आत ‘आरसीसी’ क्लासेसचे पिंपरी येथील कार्यालय प्रशासनाने कायमस्वरूपी बंद करावे, अशी आग्रही मागणी कामगार नेत्यांनी केली आहे. दिलेल्या मुदतीत कार्यालय बंद न झाल्यास आणि स्थानिक कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास पिंपरी-चिंचवड शहरात विद्यार्थ्यांसह तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही काशिनाथ नखाते यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
