news
Home अमरावती अमरावतीच्या कन्येची जागतिक भरारी! शांघाय आर्चरी वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या कुमकुम मोहोडचा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव

अमरावतीच्या कन्येची जागतिक भरारी! शांघाय आर्चरी वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या कुमकुम मोहोडचा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव

बलाढ्य चीन आणि दक्षिण कोरियाला नमवत रचला इतिहास; कुमकुमसह यशदीप भोगेची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात दिमाखात निवड | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आर्चरी वर्ल्ड कपमध्ये ‘सुवर्ण’ भेद करणाऱ्या कुमकुम मोहोडचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

अमरावती प्रतिनिधी विलास सावळे, १९ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: नुकत्याच शांघाय (चीन) येथे पार पडलेल्या ‘वर्ल्ड आर्चरी चॅम्पीयनशिप’ स्टेज-२ स्पर्धेत अमरावतीची आंतरराष्ट्रीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिने अचाट कामगिरी करत भारतीय महिला संघाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. कुमकुमने मिळवलेल्या या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय यशाबद्दल अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते तिचा शाल आणि पुस्तक देऊन क्रीडा संकुलात गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जागतिक पातळीवरील या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत भारत आणि यजमान चीन यांच्यातील अंतिम सामना ४-४ असा बरोबरीत सुटला होता. त्यानंतर झालेल्या निर्णायक ‘शूट-ऑफ’मध्ये कुमकुम मोहोडने कमालीच्या दबावाखाली अचूक लक्ष्यभेद करीत शक्तिशाली चीनला पराभूत केले. या विजयामुळे भारतीय महिला संघाने तब्बल ५ वर्षांनंतर पहिले सांघिक सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळवला.

याहून मोठी कामगिरी भारतीय संघाने उपांत्य फेरीत केली; त्यांनी तब्बल १० वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या बलाढ्य दक्षिण कोरियाच्या संघाला पराभवाचा धक्का दिला. या सुवर्णविजेत्या ऐतिहासिक भारतीय महिला संघात अमरावतीच्या कुमकुम मोहोडसह अंकिता भगत आणि ४ वेळची दिग्गज ऑलिम्पियन दीपिका कुमारी यांचा समावेश होता.

कुमकुमच्या यशाचे कौतुक करताना जिल्हाधिकारी आशिष येरेकर म्हणाले, “कुमकुमची अतिशय लहान वयातील ही कामगिरी थक्क करणारी आहे. तिचा सध्याचा अप्रतिम फॉर्म पाहता, ती २०२८ मध्ये लॉस एंजेलिस (अमेरिका) येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत निश्चितच भारताचे प्रतिनिधित्व करेल आणि देशाला पदक मिळवून देईल.”

कुमकुम ही गेल्या ९ वर्षांपासून अमरावती जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, ‘खेलो इंडिया’ आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या शूटिंग रेंजवर आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कडक सराव करीत आहे. अत्यंत कमी वयाची असलेली कुमकुम सध्या भन्नाट फॉर्मात असून, तिची आगामी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तुर्की येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्टेज-०३, स्पेन (माद्रिद) येथील वर्ल्ड कप स्टेज-४ आणि सप्टेंबरमध्ये जपान येथे होणाऱ्या मानाच्या ‘आशियाई गेम्स’साठी (Asian Games) भारतीय संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे कुमकुमसोबतच अमरावतीचा दुसरा खेळाडू यशदीप भोगे याची देखील आशियाई गेम्ससाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

या गौरव सोहळ्याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, अनिल इंगळे आणि मुख्य क्रीडा मार्गदर्शक प्रफुल्ल डांगे उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी कुमकुम आणि यशदीप या दोघांना आगामी जागतिक स्पर्धांमध्ये देशाचा तिरंगा फडकवण्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!