नागरिकांच्या सहभागातून जनगणनेला मिळणार गती; अचूक माहिती शहराच्या विकासासाठी ठरणार महत्त्वाची
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २० मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “जनगणना ही केवळ लोकसंख्येची नोंद नसून, शहराच्या भविष्यातील गरजा ओळखण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. नागरिकांनी दिलेली अचूक माहिती ही शासकीय विकास योजनांच्या योग्य आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक नागरिकाने या राष्ट्रीय कार्यात आपला सकारात्मक सहभाग नोंदवून जनगणना प्रक्रिया यशस्वी करावी,” असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
‘जनगणना २०२७’ अंतर्गत घरयादी व घरगणनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात पिंपरी-चिंचवड शहरात १६ मे २०२६ पासून झाली असून, ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया १४ जून २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेसाठी महापालिकेच्या वतीने नियुक्त केलेले प्रगणक (माहिती संकलक) प्रत्यक्ष नागरिकांच्या घरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करत आहेत.
या मोहिमेदरम्यान नागरिकांनी प्रगणकांना योग्य, अचूक आणि संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे. तसेच, ज्या नागरिकांनी डिजिटल माध्यमातून ‘स्व-नोंदणी’ (Self-Enumeration) केली आहे, अशा नागरिकांनी प्रगणक घरी आल्यावर त्यांना आपला ‘स्वयं नोंदणी क्रमांक’ उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
घरयादी व घरगणना ही संपूर्ण जनगणनेतील अत्यंत महत्त्वाची आणि प्राथमिक प्रक्रिया आहे. यामध्ये प्रामुख्याने घरांची सद्यस्थिती, कुटुंबातील सदस्यांची संख्या, शिक्षण आणि उपलब्ध नागरी पायाभूत सुविधांची सविस्तर नोंद केली जाते. या संकलित माहितीच्या आधारेच सरकार आणि महापालिका प्रशासन शहराच्या भविष्यातील विविध विकासकामांचे नियोजन, सार्वजनिक सुविधांचे वितरण तसेच सामाजिक कल्याणकारी योजनांची आखणी अधिक प्रभावीपणे करू शकते. त्यामुळे नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि त्यांनी दिलेली अचूक माहिती भविष्यातील शहर विकासाला योग्य दिशा देणारी ठरेल, असे उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.
“घरयादी व घरगणना मोहिमेदरम्यान नागरिकांनी त्यांच्या घरी येणाऱ्या प्रगणकांना आवश्यक ती माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी. जनगणनेच्या नियमांनुसार नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय ठेवली जाते. नागरिकांच्या थेट सहकार्यामुळेच अचूक सांख्यिकी संकलित होईल आणि या माहितीच्या आधारे शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळणार आहे.”
— सचिन पवार, उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
