news
Home पिंपरी चिंचवड निगडीच्या ग. दि. माडगूळकर सभागृहात रंगला ‘लोकशाही रक्षक पुरस्कार’ सोहळा; आणीबाणीच्या स्मृतींना उजाळा!

निगडीच्या ग. दि. माडगूळकर सभागृहात रंगला ‘लोकशाही रक्षक पुरस्कार’ सोहळा; आणीबाणीच्या स्मृतींना उजाळा!

आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते 'मिसा' जनशत्रूंविरुद्ध लढणाऱ्या सत्याग्रहींचा गौरव; शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, मोरेश्वर शेडगे यांच्याकडून नेटके संयोजन | © २०२६मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘संघर्ष’ हाच भाजपचा डीएनए; आमदार श्रीकांत भारतीय यांनी उलगडला आणीबाणीचा थरारक इतिहास!

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २९ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड : २५ जून १९७५ रोजी देशात लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या आणीबाणीच्या काळ्या कालखंडाला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर, निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘लोकशाही रक्षक पुरस्कार’ सोहळ्याचे अतिशय भव्य आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात आणीबाणीच्या काळातील तो अंगावर काटा आणणारा संघर्षाचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला.

याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार श्रीकांत भारतीय यांनी आपल्या ओघवत्या आणि धारदार भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला. ते म्हणाले की, “हा कार्यक्रम केवळ एक औपचारिक सोहळा नसून नव्या पिढीसाठी संघर्षाचा दीपस्तंभ आहे. भारतीय जनता पक्षाचा उदय हा आणीबाणीच्या काळात लोकांनी दिलेल्या असीम समर्पणातून आणि बलिदानातून झाला असून, ‘संघर्ष’ हाच आमच्या पक्षाचा डीएनए (DNA) आहे. इतिहास हा केवळ डोक्याने वाचायचा नसून तो हृदयाने समजून घ्यायचा असतो.” यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना लोकशाहीच्या रक्षणासाठी पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव करून देत, पक्षसंघटन बळकट करण्यासाठी आपापसातील समन्वय वाढवण्याचे आवाहन केले.

 भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात आणीबाणीच्या काळातील भीषण आठवणींना उजाळा देत तत्कालीन काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आणीबाणी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस होता, ज्या दिवशी जनतेचे सर्व मूलभूत अधिकार हिरावून घेण्यात आले होते. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही अनेक राष्ट्रभक्तांनी हसत-हसत तुरुंगवास सोसला आणि अमानुष छळ सहन केला, परंतु हुकूमशाहीसमोर कधीही गुडघे टेकले नाहीत. त्यांच्या याच अतुलनीय त्यागामुळे आज आपण स्वतंत्र आणि सुरक्षित भारतात मोकळा श्वास घेत आहोत, असे बापू काटे यांनी कृतज्ञतेने नमूद केले.

 या ऐतिहासिक सोहळ्यात आणीबाणीच्या काळात देशासाठी सत्याग्रह करणाऱ्या आणि ‘मिसा’ (MISA) कायद्यांतर्गत अमानुष जेल भोगणाऱ्या ज्येष्ठ राष्ट्रभक्तांचा व कार्यकर्त्यांचा आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते ‘लोकशाही रक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. आपल्या आयुष्याची उमेदीची वर्षे देशाच्या लोकशाहीसाठी पणाला लावणाऱ्या या योद्ध्यांचा सन्मान होताना सभागृहात उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले होते. ‘भारत माता की जय’ आणि ‘लोकशाही अमर रहे’ अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते.

 या कार्यक्रमाचे संपूर्ण आणि नेटके संयोजन भाजपा संघठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी केले. या सोहळ्याला आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार शंकर जगताप, माजी आमदार अश्विनीताई जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे उपस्थित होते.

तसेच पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्येष्ठ नेते मधू जोशी, आणीबाणी सत्याग्रही संघटनेचे आबा खांबे, माजी अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण नाईक, युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, माजी विरोधी पक्षनेत्या डॉ. गीताताई आफळे, मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडये, संजय पटनी, संतोष तापकीर, कैलास सानप, अजय पाताडे, पोपट हजारे, राजू दुर्गे, देवदत्त लांडे, अजित कुलथे, नंदू भोगले यांच्यासह सर्व मोर्चे, आघाडी व प्रकोष्ठ यांचे अध्यक्ष, सर्व मंडल अध्यक्ष, विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवदत्त भिंगारकर यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार संयोजक व संघठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी मानले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!