खरातवाडी व कदमवाडी फिडरचे विभाजन होणारच; महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखालील धरणे आंदोलन मागे
श्रीगोंदा, अहिल्यानगर प्रतिनिधी आकाश कांबळे , २९ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
श्रीगोंदा अहिल्यानगर : खरातवाडी आणि कदमवाडी परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) बेलवंडी उपविभागीय कार्यालयासमोर आज सकाळी १०.०० वाजता “बेमुदत धरणे आंदोलन” सुरू केले होते. अखेर दुपारच्या सत्रात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा करून मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
दुपारी २.०० वाजता महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संदीप डोळे आणि गणेश चौधरी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणी प्रचंड वाढलेली असून तांत्रिक बिघाडामुळे काही प्रकल्प बंद असल्याने महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार आपत्कालीन भारनियमन करावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, खरातवाडी व कदमवाडी परिसरातील स्थानिक वीज समस्या सोडवण्यासाठी महावितरणने लेखी पत्राद्वारे मुद्द्यांवर काम सुरू असल्याचे आश्वासित केले. १) खरातवाडी फिडरचे दोन भाग: खरातवाडी फिडरचे दोन भाग करण्यासाठी ‘शेंडगे वस्ती’ नावाने वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव पाठवला असून त्यानुसार पोल उभे करण्याचे काम झाले आहे. क्षीरसागर ट्रान्सफॉर्मर शेतीपंपाच्या डीपीला हे फिडर जोडून लोड कमी करण्यात येईल. २) लोड आटोक्यात आणणार: खरातवाडी व पिंपळगाव परिसरात संध्याकाळी ६ ते ९ दरम्यान ३० amp पेक्षा जास्त लोड असल्याने फिडर ट्रिप होते. दोन भाग झाल्यानंतर हा लोड कायमचा कमी होईल. ३) कदमवाडी-खरातवाडी विभाजन: या ठिकाणी पोल उभे करण्याचे काम सुरू असून ठेकेदार व वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. महावितरणकडून मटेरियल उपलब्ध होताच हे काम तातडीने पूर्ण केले जाईल. ४) रोटेशन वेळेत बदल: पिंपळगाव सपाटे वस्ती, खरातवाडी आणि कदम वस्ती येथील रोटेशनच्या वेळेत होणाऱ्या बदलांची माहिती शेतकऱ्यांना त्वरित दिली जाईल.

चर्चेदरम्यान काही आंदोलक आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये तीव्र खडाजंगी झाली. जर आमच्या समस्या तातडीने सोडवल्या गेल्या नाहीत आणि दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर थेट महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू आणि यापुढच्या काळात अधिक तीव्र आंदोलन करू, असा जाहीर इशारा शेतकऱ्यांनी दिला.

या आंदोलनात पिंपळगाव पिसा गावचे सरपंच किशोर बाप्पू पंदरकर, उपसरपंच बापुराव कदम, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्यासह लक्ष्मण इथापे, भास्कर कदम, मयूर पंदरकर, सुरेश भापकर, संतोष पंदरकर, गणेश इथापे, महेश यादव, गणेश पंदरकर, सुनील पंदरकर, अप्पासाहेब कदम, तुकाराम पंदरकर, योगेश पारखे, शुभम भापकर, किसन इथापे, दत्तात्रय ओहळ, दत्तात्रय खामकर, सुभाष पंदरकर, विनायक खरात, बबन पंदरकर, अशोक शेलार, सावता हिरवे, संजय डाके, मारुती पारखे, वसंत शिंदे, मनोज इथापे, लक्ष्मण इथापे, संजय इथापे, राहुल खरात, अमोल पंदरकर, संपत देवकाते, दिलीप भापकर, गजेंद्र भापकर, चंद्रकांत शिंदे, अर्जुन भापकर, रामदास शिंदे, रामदास महारनुर, तात्या खरात, दत्तात्रय इथापे, चंद्रकांत भापकर, विठ्ठल शिंदे, शिवाजी गोरे, विलास शेंडगे, देविदास भापकर, बाप्पू पारखे, अनिल दळवी, बंडू सलगर, गणेश जगताप, संतोष कदम, रंगनाथ कदम, प्रकाश कदम, गजानन कुताळ, शिवाजी भोर, संतोष गलबले, विश्वनाथ भापकर, धुराजी भापकर आणि शिवाजी खरात आदी शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
