पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम उत्साहात; शहरभरात २ लाख २७ हजारहून अधिक बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २९ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ शहरातील विविध रुग्णालय व दवाखान्यांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मोहिमेच्या माध्यमातून ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन पोलिओमुक्त आणि निरोगी भारत घडविण्याचा संकल्प करण्यात आला.
शहरातील श्रीम. इंदिरा गांधी प्रसूती रुग्णालय सांगवी येथे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते, ह.भ.प. मल्हारराव कुटे रुग्णालय आकुर्डी येथे उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते, तर तालेरा रुग्णालयात आमदार उमा खापरे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते मोहिमेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. भोसरी रुग्णालय येथे महिला व बालकल्याण समिती सभापती राणीताई पठारे, नगरसदस्या सोनाली गव्हाणे, नगरसदस्य विराज लांडे, ॲड. नितीन लांडगे, माजी नगरसदस्या भीमाताई फुगे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या हस्ते तर वायसीएम रुग्णालयात माजी महापौर योगेश बहल यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस पाजून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. याशिवाय महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये स्थानिक आजी-माजी नगरसेवक व नगरसदस्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.

सदर मोहीम शहरातील ११२३ पोलिओ लसीकरण केंद्रांवर यशस्वीपणे राबविण्यात आली. महानगरपालिका दवाखाने, रुग्णालये, अंगणवाडी केंद्रे, बस स्थानके, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके तसेच फिरत्या लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मोहिमेत ० ते ५ वर्षांखालील २,२७,९५३ बालकांना, तसेच ५ वर्षांवरील ३,६८३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले.

ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४५५२ लसीकरण कर्मचारी कार्यरत होते. या मोहिमेच्या यशासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहा. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, महाराष्ट्र शासन पुणे विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. राजश्री ढवळे, सहा. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलवडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. शिवाजी ढगे, डॉ. ऋतुजा लोखंडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागांचे अधिकारी, एएनएम, एमपीडब्ल्यू, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला आरोग्य समिती सदस्य, रोटरी क्लबचे स्वयंसेवक आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी अतोनात परिश्रम घेतले.
ज्या पालकांना रविवारी काही कारणास्तव आपल्या बालकाला पोलिओचा डोस देता आला नाही, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी थेट घरभेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देणार आहेत. नागरिकांनी या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपल्या बालकांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
“प्रत्येक पालकाने आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत. आपल्या एका छोट्याशा कृतीतून बालकांचे भविष्य सुरक्षित होईल आणि पोलिओमुक्त भारताचे स्वप्न अधिक बळकट होईल. सुटलेल्या बालकांसाठी २९ जून ते ३ जुलै दरम्यान घरभेटीस येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून डोस अवश्य पाजून घ्यावेत.”
कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
“राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम ही प्रत्येक बालकाच्या निरोगी भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शहरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी महापालिकेने व्यापक व्यवस्था केली आहे. पालकांनी आरोग्य कर्मचारी घरभेटीला आल्यानंतर पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य द्यावेत.”
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
