पिंपरी-चिंचवड भाजपात आता ‘शिस्त पर्व’; शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांचा सज्जड इशारा – ‘कामगिरी दाखवा, अन्यथा पद सोडा!’
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , २ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून पक्ष संघटनेला कमालीची गती दिली आहे. त्यांच्या याच आक्रमक आणि कौशल्यापूर्ण नेतृत्वाखाली आता शहरात भाजपाचे ‘शिस्त पर्व’ सुरू झाले असून, पक्षशिस्तीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा धडाकेबाज निर्णय त्यांनी घेतला आहे. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता थेट ‘ॲक्शन’ घेतली जाणार असून, पक्षाची प्रतिमा अधिक उजळ करण्यासाठी बापू काटे यांनी कंबर कसली आहे.
शहरातील वाढत्या अंतर्गत मतभेद आणि सार्वजनिक वक्तव्यांची गंभीर दखल घेत, शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप शहर कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत बापू काटे यांनी, “कामगिरी दिसेल तरच पदलाभ, अन्यथा कोणालाही सूट नाही,” असा सज्जड आणि ऐतिहासिक इशारा दिला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने बापू काटे यांनी घेतलेली ही भूमिका भाजपला शहरात अधिक मजबूत करणारी ठरणार आहे.
या उच्चस्तरीय बैठकीला आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव खाडे आणि सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष बापू काटे यांनी पक्ष वाढीसाठी अत्यंत कठोर आणि शिस्तबद्ध पावले उचलली आहेत.
पक्षात गटबाजी किंवा वैयक्तिक हेवेदावे खपवून घेतले जाणार नाहीत. पक्षाची अधिकृत भूमिका हीच अंतिम मानली जाईल. संघटनेच्या व्यासपीठावर चर्चा न करता थेट माध्यमांसमोर जाणे किंवा दबावतंत्र वापरणे हा गंभीर शिस्तभंग मानला जाईल आणि अशांवर तात्काळ कठोर संघटनात्मक कारवाई बापू काटे यांच्या निर्देशानुसार केली जाईल. केवळ नावापुरते पद भूषवणाऱ्यांचे दिवस आता संपले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या कामाचा स्वतंत्र आढावा घेतला जाणार आहे. बूथ स्तरावरील काम, सदस्य नोंदणी, जनसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांच्या आधारेच पदाधिकाऱ्यांचे मूल्यमापन होणार आहे. प्रत्यक्ष मैदानात उतरून कामगिरी करणाऱ्यांनाच भविष्यात संघटनेत मोठी संधी दिली जाईल. महापालिकेतील स्वीकृत सदस्य नियुक्तीचे अधिकार आता स्थानिक पातळीवर अत्यंत कठोर निकषांच्या चौकटीत राहूनच वापरले जातील, असा महत्त्वपूर्ण निर्णय बापू काटे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.
शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कार्यकर्त्यांना सक्रिय करत भाजपमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण केली आहे. पक्षाची प्रतिमा सर्वसामान्य जनतेमध्ये अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी घेतलेले हे निर्णय त्यांच्यातील कुशल प्रशासक आणि कणखर संघटक अधोरेखित करतात. पक्षांतर्गत शिस्त आणून आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयरथ सुसाट धावण्यासाठी बापू काटे यांनी टाकलेले हे पाऊल अत्यंत मैलाचा दगड ठरणार आहे.
“भारतीय जनता पक्ष ही शिस्त, संघटन आणि कार्यकर्त्यांच्या कष्टावर उभी असलेली विचारसरणी आहे. पक्षात वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा संघटनेचे हित सर्वोच्च आहे. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही. संघटनेने दिलेली जबाबदारी जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडतील, त्यांनाच भविष्यात संधी मिळेल. पक्षविरोधी भूमिका किंवा शिस्तभंग कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.”
— शत्रुघ्न (बापू) काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
