संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडून पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी; मेट्रोच्या बॅरिकेटींग आणि अडथळे हटवण्याचे आदेश
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी काल (१ जुलै) श्री क्षेत्र देहू येथील मंदिर परिसर आणि संपूर्ण पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. येत्या ७ जुलै २०२६ रोजी हा ऐतिहासिक पालखी सोहळा नियोजित असून, वारी शांततेत, निर्विघ्नपणे आणि भक्तीमय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.
देहू येथील मुख्य मंदिर परिसराच्या पाहणीदरम्यान पोलीस आयुक्त चौबे यांनी संत तुकाराम महाराज संस्थानच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थानचे अध्यक्ष श्री. जालिंदर विश्वनाथ मोरे महाराज आणि विश्वस्त श्री. गणेश उत्तम मोरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, गर्दीचे व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्वांच्या सहकार्याने व समन्वयाने चोख बंदोबस्त ठेवला जाईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. तसेच, त्यांनी नव्याने तयार करण्यात येत असलेल्या पालखी रथाचीही पाहणी केली. दर्शनबारीच्या ठिकाणी गर्दी नियंत्रणासाठी रस्सी आणि भक्कम बॅरीकेटींगचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी संस्थानच्या वतीने पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पालखी मार्गावरील महत्त्वाचे विसावा स्थळ असलेल्या अनगडशहाबाबा दर्गा आणि चिंचोलीगाव येथील श्री शनि मंदिर येथे भेट देऊन आयुक्तांनी व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी ते भक्तीशक्ती चौक, निगडी येथे पोहोचले.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. कुलदीप जंगम, उपायुक्त श्री. प्रदीप ठेंगल आणि महामेट्रोचे निवासी अभियंता श्री. यतेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. भक्तीशक्ती चौक ते मोरवाडी चौक दरम्यान पुणे मेट्रोचे काम सुरू असल्याने मेट्रोचे मोठे कॉलम आणि बॅरीकेटींगमुळे हा मार्ग अरुंद झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना म्हणून आयुक्तांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना खालील महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
मेट्रोचे बॅरीकेटींग आतमध्ये सरकवून पालखीसाठी रस्ता मोकळा करणे, आवश्यक त्या ठिकाणी भक्कम संरक्षक जाळ्या बसवणे, रस्त्यावरील राडारोडा (डेब्रिज) हटवून रस्ता तातडीने समतल करणे. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पालखी मार्गातील रस्त्यांच्या कडेचा राडारोडा हटवणे, पालखीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे आणि मार्गातील कमानी तात्पुरत्या काढून रस्ता रुंद करण्याच्या सक्त सूचना त्यांनी दिल्या.
या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यात पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासोबत डॉ. शशिकांत महावरकर (पोलीस सह आयुक्त), श्री. सारंग आवाड (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे), श्री. बसवराज तेली (अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग), श्रीमती श्वेता खेडकर (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४), श्री. संदीप आटोळे (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १), श्री. रोहीदास पवार (पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा), श्री. मारुती जगताप (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३), श्री. धीरज पाटील (पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा) आणि श्री. विक्रांत देशमुख (पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा), श्री. कुलदीप जंगम (अतिरिक्त आयुक्त) आणि श्री. प्रदीप ठेंगल (उपायुक्त), श्री. यतेंद्र कुलकर्णी (रेसिडेंट इंजिनिअर, पुणे मेट्रो) उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
