बसथांब्यांचा अभाव आणि गैरसोयींमुळे प्रवासी त्रस्त; ‘अन्यथा’ फोटो पाठवून जाब विचारणार, राष्ट्रवादी अर्बन सेलचे प्रदीप गायकवाड यांचा PMPML प्रशासनाला इशारा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत शहरात पुरेशा बसथांब्यांचा (Bus Shelters) अभाव असल्याने प्रवाशांना भर पावसाळ्यात उघड्यावर बसची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. प्रवाशांच्या या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी पीएमपीएमएल (PMPML) चे कार्यकारी अधिकारी श्री. यशवंत हिंगे यांना नुकतेच एक जाहीर निवेदन दिले. “आम्ही नेहमी हात जोडून विनंती करतो, पण नाईलाज झाल्यास हात सोडून बोलावे लागेल,” अशा कडक शब्दांत गायकवाड यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. या निवेदनाद्वारे शहरातील लाखो बस प्रवाशांच्या, विशेषतः महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्याच्या दिवसांत अनेक नोकरदार महिला आणि नागरिक दुचाकीचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला म्हणजेच ‘पीएमपीएमएल’ बस प्रवासाला प्राधान्य देतात. यामुळे बसमधील प्रवासी संख्या कमालीची वाढते. परंतु, शहरात अनेक ठिकाणी अधिकृत आणि सुसज्ज बसथांबेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे भर पावसात प्रवाशांना छत्री धरून किंवा आडोश्याअभावी भिजत बसची वाट पाहत उभे राहावे लागते. बसथांब्यांची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांना मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शहरात योग्य बसथांबे नसल्याने अनेकदा बस रस्त्याच्या मधोमध किंवा अयोग्य ठिकाणी थांबवाव्या लागतात. अशा वेळी बस पकडण्याच्या घाईत महिला, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पीएमपीएमएल प्रशासनाने तातडीने ज्या ज्या मार्गांवर किंवा चौकांमध्ये बसथांबे नाहीत, त्यांची संयुक्त पाहणी करावी आणि तिथे त्वरित सुसज्ज बसथांबे उभारावेत, अशी मागणी प्रदीप गायकवाड यांनी केली आहे.
शहरात ज्या ज्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी असते, तिथे तात्काळ नवीन बसथांबे तयार करण्यात यावेत, प्रत्येक बसथांब्यावर कोणत्या क्रमांकाची बस कधी येणार आणि कधी सुटणार, याचे अद्ययावत वेळापत्रक (Timetable) ठळकपणे लावण्यात यावे, अनेकदा चालक-वाहकांकडून प्रवाशांना उद्धट वागणूक दिली जाते. त्यामुळे पीएमपीएमएलचे चालक व वाहक यांनी प्रवाशांशी अत्यंत सौजन्याने आणि आदराने वागावे, अशा सक्त सूचना प्रशासनाने द्याव्यात. चालकांनी बस कुठेही न थांबवता, ती अधिकृत बसथांब्यावरच डाव्या बाजूला शिस्तबद्धपणे थांबवावी, जेणेकरून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सुरक्षितपणे चढता-उतरता येईल.
प्रशासनाला इशारा देताना प्रदीप गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “अनेकदा सूचना देऊनही जर चालक-वाहकांनी आपल्या पद्धतीत सुधारणा केली नाही, बस थांब्यावर थांबवली नाही किंवा प्रवाशांशी गैरवर्तन केले, तर अशा चालक-वाहकांचे थेट छायाचित्र (Photos) काढून ते थेट तुमच्याकडे (कार्यकारी अधिकारी) पाठवण्यात येईल. त्यानंतर होणाऱ्या तीव्र परिणामांना सर्वस्वी पीएमपीएमएल प्रशासनच जबाबदार असेल. बाकी तुम्ही सुज्ञ आहात,” असा सज्जड दम गायकवाड यांनी दिला आहे.
नागरिकांच्या रोजच्या प्रवासाशी आणि सुरक्षेशी निगडित असलेल्या या प्रश्नावर आता पीएमपीएमएलचे कार्यकारी अधिकारी यशवंत हिंगे काय पावले उचलतात, याकडे पिंपरी चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
