शिक्षण व्यवस्थेची लक्तरे भाजपा सरकारने वेशीवर टांगली: काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांचा घणाघात; पेपरफुटीच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान १ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
“देशात आणि राज्यात भाजप सरकारच्या काळात शिक्षण व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा क्रूर व्यापार सुरू आहे,” असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केला आहे. देशात आणि राज्यात सातत्याने होत असलेल्या विविध परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांवर जाब विचारण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यात ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्यासह महाविकास आघाडी आणि विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
1) NEET, TET, पुणे मनपा भरतीसह अनेक परीक्षांचे पेपर पैशांच्या बदल्यात उघडपणे विकले जात असल्याचा काँग्रेसचा दावा, 2)केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्यातील मंत्री दादा भुसे यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी, 3)देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पेपरफुटी विरोधी कडक कायदा जर सक्षम होता, तर पुन्हा TET चा पेपर फुटला कसा? 4)राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, NSUI आणि युवक काँग्रेस देशभर रस्त्यावर उतरणार.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रवक्ते हनुमंत पवार म्हणाले, “केंद्र आणि राज्य सरकारने युवक व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा क्रूर खेळ आता तात्काळ बंद करावा. देश पातळीवरील ‘NEET’ ची पेपरफुटी, महाराष्ट्रातील ‘TET’, राजस्थानमधील पॅरामेडिक परीक्षा आणि थेट पुणे महापालिकेतील नोकरभरतीची पेपरफुटी, अशा असंख्य परीक्षांचे पेपर या सरकारच्या काळात चक्क कोट्यवधी रुपये घेऊन विकले जात आहेत. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे, एवढे मोठे घोटाळे होऊनही कोणावरही जबाबदारी निश्चित होत नाही. सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात थेट गुंतलेले असून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करताना पवार पुढे म्हणाले, “विधानसभेच्या मागील अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी पेपरफुटीच्या विरोधात कडक कायदा केल्याचे मोठे भाषण ठोकले होते. जर तुमचा कायदा इतका सक्षम होता, तर हा कायदा अस्तित्वात आल्यानंतरही ‘TET’ चा पेपर फुटलाच कसा? तुमचा कायदा कुचकामी आहे, की प्रशासनातील अधिकारी भ्रष्ट आहेत, की मंत्रालयातील मंत्रीच या पेपरफुटीत भागीदार आहेत? याची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिली पाहिजेत. २०२१ च्या TET पेपरफुटीत शिक्षण खात्यातील ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक झाली होती, त्या केसचे पुढे काय झाले? यावरही आता मुख्यमंत्री बोलत नाहीत. या भाजपच्या लोकांनी आधी पेपर फोडले, मग आमदार-खासदार फोडले आणि आता मंदिराची दानपेटीही फोडली; जनता यांना यांची जागा नक्की दाखवेल.”
काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनीही सरकारवर तीव्र शब्दांत कडाडून टीका केली. ते म्हणाले, “‘पेपर फुटतो, विश्वास तुटतो’ असा विश्वासघात या सरकारच्या काळात विद्यार्थ्यांसोबत सातत्याने होत आहे. सर्वच स्तरांवर अपयशी ठरलेले हे सरकार आता विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा व्यापार करण्यावर उठले आहे. ऐन परीक्षेच्या काळात प्रश्नपत्रिका विकल्या जाणे ही बाब देशाच्या सुरक्षेला आणि संस्कृतीला मोठा धोका निर्माण करणारी आहे. या नैराश्यातून आजवर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या झालेल्या या शैक्षणिक वर्षाच्या अतोनात नुकसानीची भरपाई हे सरकार कशी करणार? या भ्रष्टाचाराच्या दुष्टचक्रात होरपळलेले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या भाजप सरकारला कधीही माफ करणार नाहीत. भविष्यात सत्तेच्या परीक्षेत या सरकारला सपशेल ‘फेल’ केल्याशिवाय जनता शांत बसणार नाही.”
या प्रसंगी काँग्रेस आणि सहयोगी संघटनांचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने हनुमंत पवार (प्रदेश काँग्रेस प्रवक्ते), नरेंद्र बनसोडे (काँग्रेस शहराध्यक्ष), अशोक मोरे (प्रदेश काँग्रेस सचिव), गौतम आरकडे (माजी सचिव), शहाबुद्दीन शेख (अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्ष), स्वप्निल बनसोडे (महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव), धनाजी येळकर पाटील (अध्यक्ष, छावा मराठा युवा महासंघ), प्रवीण कदम (अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), कबीर मोहम्मद, राहुल शिंपले, सुरज कुलकर्णी, विल्यम साळवी, सदाशिव तळेकर, हिराचंद जाधव, लक्ष्मण म्हेत्रे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


