कासारवाडीत ‘श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज शाळेच्या’ अत्याधुनिक इमारतीचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन; महापालिका शाळांमध्ये ‘वारे गुरुजी पॅटर्न’ राबवणार
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , २ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
“विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शालेय शिक्षण पुरेसे नसून, त्यांच्यात वाचन संस्कृती जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली तरच त्यांची विचारशक्ती अधिक सक्षम होईल. येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी महापालिका कटिबद्ध असून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत,” असे प्रतिपादन महापौर रवी लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील ‘श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळा’ या नवीन, सुसज्ज व अत्याधुनिक पाच मजली शाळा इमारतीचे उद्घाटन महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, नगरसदस्य जितेंद्र ननावरे, नगरसदस्या मनीषा लांडे, नगरसदस्या वर्षा जगताप, नगरसदस्या प्रतीक्षा जवळकर, नगरसदस्या रिटा सानप, नगरसदस्या श्रुती वाकडकर, माजी नगरसदस्य शाम लांडे, माजी नगरसदस्य माऊली थोरात, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील प्रकाश जवळकर, राजेंद्र शेळके, रतन लांडगे, अशोक पगारे, रमेश लांडगे, ॲड. संजय गोडसे, भगवान धावटे, डॉ. महेश शेटे, शरद औटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेच्या शाळांना आधुनिक रूप देण्याबाबत माहिती देताना महापौर रवी लांडगे म्हणाले की, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही इमारत उभारण्यात आली आहे. महापालिकेच्या प्रत्येक शाळेत ‘अक्षर विश्व’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी आणि अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी प्रसिद्ध ‘वारे गुरुजी पॅटर्न’ देखील महापालिकेच्या शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. या आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धतीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळा शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करतील, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.
महापौरांनी या नवीन इमारतीची सविस्तर पाहणी करून वर्गखोल्या, प्रयोगशाळा, सभागृहे आणि इतर सुविधांची माहिती घेतली. नवीन पाच मजली इमारतीत एकूण २४ प्रशस्त वर्गखोल्या असून, सुमारे ९६० विद्यार्थी येथे शिक्षण घेणार आहेत. प्रयोगाधारित शिक्षणासाठी अद्ययावत संगणक कक्ष, रसायनशास्त्र प्रयोगशाळा, गणित प्रयोगशाळेसह एकूण ५ अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. नृत्य, कला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर शैक्षणिक उपक्रमांसाठी ४ स्वतंत्र भव्य सभागृहे तयार करण्यात आली आहेत. शाळेच्या सुरळीत व्यवस्थापनासाठी ४ स्वतंत्र कार्यालयांची व्यवस्था आहे. नवीन इमारतीची हि वैशिष्ट्ये आहेत.
या उद्घाटन सोहळ्यादरम्यान महापौरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत उपलब्ध सुविधांचा योग्य उपयोग करून दर्जेदार शिक्षण घेण्याचे आवाहन केले. या नवीन इमारतीमुळे कासारवाडी परिसरातील सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या वातावरणात शिकण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण प्रास्ताविक नगरसदस्य जितेंद्र ननावरे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले आणि उपस्थितांचे आभार नगरसदस्या मनीषा लांडे यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

