news
दिल्ली मतदार यादी पुनरीक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; बाधित मतदारांची नावे आणि कारणे सार्वजनिक करण्याचे आवाहन!‘नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समिती बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!‘शिक्षकांमुळेच महापालिका शाळांकडे पालकांचा कल वाढला’; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान!‘शहराच्या नियोजनबद्ध विकासात पालिकेच्या अभियंत्यांचे योगदान अद्वितीय’; महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ही लोकचळवळ व्हावी’; पिंपरी महापालिकेच्या नियोजन बैठकीत महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये पालखी स्वागतासाठी मनपा सज्ज; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला तयारीचा ऑन-द-स्पॉट आढावा!

पिंपरी-चिंचवडमध्ये पालखी स्वागतासाठी मनपा सज्ज; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला तयारीचा ऑन-द-स्पॉट आढावा!

निगडी ते दापोडी मुख्य मार्गाची पाहणी; अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्यासह फौजफाटा मैदानात, मेट्रोचे बॅरिकेड्स हटवण्याचे निर्देश | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची जय्यत तयारी; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून पालखी मार्ग अन् विसावा स्थळांची प्रत्यक्ष पाहणी

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड शहरात होणारे आगमन आणि प्रस्थान अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित अन् सुरळीत पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज स्वतः संपूर्ण पालखी मार्ग आणि विविध विसावा ठिकाणांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. “पालखी सोहळा हा लाखो भाविकांच्या श्रद्धेचा विषय असल्याने, वारीत येणाऱ्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय खपवून घेतली जाणार नाही,” असे स्पष्ट करत आयुक्तांनी आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षेच्या सुविधा वेळेत पूर्ण करण्याचे सक्त आदेश सर्व संबंधित विभागांना दिले आहेत.

या महत्त्वाच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, प्रभाग अधिकारी अतुल पाटील, प्रभाग अधिकारी निवेदिता घार्गे, कार्यकारी अभियंता शिवाजी चौरे, वैशाली ननावरे, विजय भोजने, उमेश मोने यांच्यासह महापालिकेचे विविध विभागप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सकाळी निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातून या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. महापालिकेच्या वतीने वारीच्या स्वागतासाठी उभारण्यात येणाऱ्या मुख्य स्वागत कक्षाच्या जागेची त्यांनी पाहणी केली. सध्या या भागात मेट्रोचे काम सुरू असल्याने पालखी मार्गात येणारे अडथळे आणि अडचणी तात्काळ दूर करण्याचे निर्देश त्यांनी मेट्रो व महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

त्यानंतर आयुक्तांनी विठ्ठलवाडी येथील हनुमान मंदिर आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील पालखी तळ, दर्शन रांग (दर्शनबारी) आणि मंडप व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. पालखी मार्गावर आणि विसावा स्थळांच्या आसपास असणाऱ्या अनधिकृत टपऱ्या तसेच रस्त्यांवर बसणाऱ्या लहान व्यावसायिकांमुळे भाविकांच्या व वारीच्या प्रवासात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे व अतिक्रमण हटवण्याचे आदेश त्यांनी दिले.

 

पालखी विसावा ठिकाणांची बारकाईने पाहणी करताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खालील महत्त्वपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या.  पालखीचा मार्ग प्रशस्त व्हावा यासाठी आकुर्डी आणि निगडी भागात मेट्रो कामाचे लावलेले अतिरिक्त बॅरिकेड्स बाजूला सारण्याचे आदेश दिले. पावसाळ्याचे दिवस असल्याने पालखी तळाच्या मैदानावर चिखल होऊन वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी तात्काळ मैदानावर खडी व मुरूम टाकून रस्ता समतल करण्याचे निर्देश दिले. संपूर्ण पालखी मार्गावर अद्ययावत प्रकाश व्यवस्था (पथदिवे) आणि वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या. आकुर्डीतील खंडोबा चौकात मेट्रोच्या कामांमुळे पालखीला अडथळा येणार नाही याची खातरजमा करत, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आणि पालखी रथाला अडथळा ठरणार्या झाडांच्या फांद्या तात्काळ छाटण्याचे आदेश दिले.

दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात आयुक्तांनी दापोडी येथील मुख्य संत तुकाराम महाराज पालखी विसावा स्थळाची सविस्तर पाहणी केली. तिथल्या एकूणच तयारीबाबत आणि नियोजनाबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले, तसेच आवश्यक तिथे आणखी काही किरकोळ सुधारणा करण्याचे आदेश दिले. “आरोग्य पथके, फिरती शौचालये, चोख स्वच्छता आणि सुरक्षा या सर्व गोष्टी महापालिकेने वेळेत पूर्ण करून पिंपरी-चिंचवड नगरीत वारकऱ्यांचे उत्तम आदरातिथ्य करावे,” असे आवाहन शेवटी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व विभागांना केले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!