स्मार्ट मीटरच्या ‘शॉक’मुळे नागरिक त्रस्त; प्रीपेड स्मार्ट मीटर हटवून जुनेच मीटर बसवा, शिवनेरी गृहनिर्माण संस्थेचा महावितरणला तीव्र आंदोलनाचा इशारा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , २ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी येथील ‘शिवनेरी गृह निर्माण संस्था’ (प्रधानमंत्री आवास योजना) येथील रहिवाशांच्या वतीने महावितरण प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सोसायट्यांमध्ये बसवण्यात आलेल्या प्रीपेड स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात झालेली भरमसाठ वाढ आणि तांत्रिक त्रुटींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, आज (२ जुलै) शिवनेरी सोसायट्याच्या रहिवाशांच्या वतीने महावितरणच्या (MSEDCL) आकुर्डी विभागीय कार्यालयाला एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. “हे जाचक प्रीपेड स्मार्ट मीटर तात्काळ हटवून पूर्वीचेच नेहमीचे वीज मीटर पुन्हा बसवावेत, अन्यथा तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल,” असा सज्जड इशारा रहिवाशांनी दिला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती साहेबराव भापकर आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
महावितरणला दिलेल्या निवेदनात रहिवाशांनी आपल्या गंभीर समस्या मांडल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या या गृहनिर्माण संस्थेत प्रीपेड स्मार्ट मीटर बसविल्यापासून अनेक सभासदांच्या वीज बिलामध्ये अनपेक्षित आणि प्रचंड वाढ झाली आहे. नागरिकांचा प्रत्यक्ष वीज वापर आणि मीटरमध्ये दाखवल्या जाणाऱ्या नोंदी (Readings) यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. यामुळे बिलांच्या अचूकतेबाबत ग्राहकांच्या मनात तीव्र शंका निर्माण झाली असून, सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
या संशयास्पद बिलवाढीची महावितरणने स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करावी आणि तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांवर अन्यायकारकपणे आकारण्यात आलेली अतिरिक्त रक्कमेचे बिलामध्ये तातडीने समायोजन (Adjustment) करून नागरिकांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
“स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची होणारी आर्थिक लूट सहन केली जाणार नाही. महावितरण प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने आणि सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर शिवनेरी सोसायटीतील सर्व नागरिक रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील,” असा इशारा माजी नगरसेवक मारुती भापकर व रहिवाशांनी दिला आहे.
आकुर्डी येथील महावितरण कार्यालयात निवेदन देण्यासाठी शिवनेरी सोसायटीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने मा. मारुती साहेबराव भापकर (माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते), विशाल भालेराव (D-Wing चेअरमन), जिजाबराव जाधव, अंकुश गंगणे, सादिकभाई पठाण, युवराज चौधरी, विक्रम बनकर, प्रकाश ईजगत, बालाजी पाटील, तुकाराम भालेराव, विपुल झोपे, उत्तम बाबरे, अलंकार, जुनेद अन्सारी, रवी गवळी, दिनेश काळे यांच्यासह प्रधानमंत्री आवास योजनेतील शेकडो महिला व पुरुष सभासद उपस्थित होते. “हा लढा आपल्या सर्वांच्या न्याय्य हक्कासाठी आणि आर्थिक सुटकेसाठी असून, सर्व रहिवाशांनी यात एकजुटीने सहभागी व्हावे,” असे आवाहन ‘डी-विंग’चे चेअरमन विशाल भालेराव यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


