मोशी दुर्घटना : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले थेट ॲक्शन मोडमध्ये! घटनास्थळासह रुग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट; महापालिकेला आर्थिक मदतीसह मोफत उपचारांचे कडक निर्देश
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १३ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पात घडलेल्या अत्यंत भीषण आणि दुर्दैवी दुर्घटनेचे पडसाद आता थेट दिल्ली दरबारी उमटले आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदासजी आठवले साहेब यांनी आज थेट मोशी येथील दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची सखोल माहिती घेतली. तसेच, या दुर्घटनेत गंभीर जखमी होऊन रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.
या कठीण प्रसंगात पीडित कामगार आणि त्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी केंद्र सरकार आणि रिपब्लिकन पक्ष खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्यासोबतच महापालिकेच्या वतीने तात्काळ मोठी आर्थिक मदत जाहीर करण्याचे कडक निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे आणि उपस्थित एनडीआरएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बचावकार्याचा व दुर्घटनेच्या कारणांचा सविस्तर आढावा घेतला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली.
यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, “या मोशी दुर्घटनेत जे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांना महापालिकेच्या वतीने तातडीने आर्थिक मदत सुपूर्द करण्यात यावी. कोणत्याही जखमी नागरिकाच्या उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. त्यांना तातडीने व सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळतील आणि आवश्यक ती सर्व मदत प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिली जाईल, याची जबाबदारी आयुक्तांनी घ्यावी.” दुर्घटनेतील जखमी नागरिक लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावेत, अशी सदिच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या या महत्त्वपूर्ण दौऱ्यादरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आरपीआयचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, नगरसेवक तथा गटनेते कुणाल वाव्हळकर, पुणे शहराचे उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक धर्मपालजी तंतरपाळे, नगरसेवक डॉ. सुहास कांबळे, महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांताताई सोनकांबळे, वाहतूक आघाडी अध्यक्ष अजिजभाई शेख, महाप्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सम्राट जकाते, अल्पसंख्याक आघाडीचे खाजाभाई शेख, सरचिटणीस बाबा सरोदे, युवक शहराध्यक्ष धम्मरत्न गायकवाड, युवक उपाध्यक्ष संतोषभाऊ डेंगळे, शहर संघटक अक्षय दुनगव, भोसरी विधानसभा अध्यक्ष अतुल उबाळे, पश्चिम महासचिव सिकंदर सूर्यवंशी आणि माजी शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांसह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्वतः ग्राउंड झिरोवर उतरून घेतलेल्या या पुढाकारामुळे पीडित कुटुंबांना आणि जखमींना मोठा दिलासा मिळाला असून, महापालिका प्रशासनालाही तातडीने पावले उचलावी लागणार आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


