news
मोशी दुर्घटनेप्रकरणी ‘अँटोनी लारा’ कंपनी आणि पर्यावरण विभागाला कारणे दाखवा नोटीस; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे कडक निर्देशपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी पद्धतीवर राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंतभाऊ भोसले कडाडले; मोशी दुर्घटनेवरून आंदोलनाचा इशारापुण्यात १८ जुलै रोजी इस्कॉन (ISKCON) बीसीईसी तर्फे भव्य ‘भगवान जगन्नाथ रथयात्रा’ सोहळा; बानेरमध्ये पहिल्यांदाच अवतरणार ‘पुरी’ची दिव्य परंपरामोशी येथील गुरुकुलम् व चाफेकर विद्यामंदिराच्या नुकसानीची महापौर रवि लांडगे यांच्याकडून ‘ऑन द स्पॉट’ पाहणीखडकी आणि कॅम्प परिसरात आरपीआय (ए) ख्रिश्चन सेलचा वारकऱ्यांसाठी अनोखा सेवायज्ञ; डॉर्थी आर. थॉमस आणि क्रिस्टोफर राजमणी यांच्याकडून अहोरात्र मदतकार्य
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी पद्धतीवर राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंतभाऊ भोसले कडाडले; मोशी दुर्घटनेवरून आंदोलनाचा इशारा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी पद्धतीवर राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंतभाऊ भोसले कडाडले; मोशी दुर्घटनेवरून आंदोलनाचा इशारा

१ मजल्याच्या जागी बेकायदेशीर २ मजली इमारत कशी उभी राहिली? बंद पडलेल्या आधुनिक कचरा प्रकल्पावरून प्रशासनाचा केला भांडाफोड | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मोशी दुर्घटना ‘श्रीमंत मनपा’चे नाक कापणारी; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा १५ दिवसांत महापालिकेवर कचरा वाहनांसह धडकणार! – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा तीव्र इशारा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: मोशी कचरा डेपो येथील भीषण दुर्घटनेत निष्पाप कामगारांचा झालेला मृत्यू ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत म्हणून मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचे ‘नाक कापणारी’ अत्यंत दुर्दैवी घटना आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते श्री. यशवंतभाऊ भोसले यांनी केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत यशवंतभाऊ भोसले यांनी पत्रकार परिषदेत पालिका प्रशासन आणि कंत्राटदारांच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढले.

“महापालिकेत आपत्कालीन परिस्थितीत राबवण्यात येणारे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ (आपत्ती व्यवस्थापन) पूर्णपणे कोलमडले असून येथे फक्त ‘सेटिंग मॅनेजमेंट’ सुरू आहे,” असा खळबळजनक आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांमार्फत ‘SIT’ चौकशी करण्याची मागणी केली. पुढील १५ दिवसांत पालिका आयुक्तांनी कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर हजारो कामगारांसह कचरा वाहने घेऊन महापालिकेवर तीव्र धडक आंदोलन छेडण्याचा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी नेहमीच खंबीरपणे उभे राहणारे नेते म्हणून यशवंतभाऊ भोसले यांच्या या भूमिकेमुळे कामगार वर्गात मोठी एकजूट निर्माण झाली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी महापालिकेच्या कंत्राटी पद्धतीवर कडक शब्दांत प्रहार केला. ते म्हणाले, “महापालिका नागरिकांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करते; मात्र कचरा संकलन, स्वच्छता, पाणीपुरवठा यांसारखी कायमस्वरूपी स्वरूपाची कामे कंत्राटी पद्धतीने करून मोठा भ्रष्टाचार केला जात आहे. काही ठेकेदार, दलाल आणि राजकीय हितसंबंध जपण्यासाठी ही बेकायदेशीर व शोषण करणारी व्यवस्था सुरू ठेवण्यात आली आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कामगारांना जिवंतपणी साधी सुरक्षितता, आवश्यक सुरक्षा साहित्य, गणवेश, वैद्यकीय सुविधा किंवा नियमित आरोग्य तपासणी देखील दिली गेली नाही. अनेक वर्षे कचऱ्यात काम केल्यामुळे कामगारांना गंभीर आजार होतात, तरीही त्यांच्या आरोग्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.”

दुर्घटनेच्या तांत्रिक कारणांवर बोट ठेवताना यशवंतभाऊ भोसले यांनी महापालिकेचे मोठे अपयश चव्हाट्यावर आणले. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली इमारत ही पूर्णपणे बेकायदेशीर होती. केवळ एका मजल्याची परवानगी असताना तेथे दोन मजली इमारत उभारून प्रशासनाचे कर्मचारी व कंत्राटी कामगार काम करत होते.

तसेच, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला आधुनिक प्रकल्प अनेक महिन्यांपासून बंद असल्याचा मोठा खुलासा त्यांनी केला. या प्रकल्पातील अत्याधुनिक यंत्रसामग्री काही महिन्यांतच कचऱ्याचे डोंगर संपविण्याची क्षमता ठेवत असतानाही, केवळ तांत्रिक कर्मचारी नियुक्त न केल्यामुळे आणि योग्य नियोजनाच्या अभावामुळे हा प्रकल्प बंद पडला. परिणामी कचऱ्याचे डोंगर वाढत गेले आणि ही दुर्घटना घडली. त्यामुळे कारखाना बंद ठेवणारे अधिकारीही या मृत्यूला तितकेच जबाबदार आहेत, असे भोसले यांनी स्पष्ट केले.

कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि भविष्यासाठी यशवंतभाऊ भोसले यांनी प्रशासनासमोर मागण्या अत्यंत आक्रमकपणे मांडल्या आहेत. १. केवळ आर्थिक मदत देऊन कामगारांचा जीव परत येणार नाही, त्यामुळे प्रत्येक मृत कामगाराच्या वारसाला तातडीने महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी.२. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ विशेष चौकशी पथक (SIT) नेमावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. ३. कंत्राटी पद्धत पूर्णपणे बंद करून सर्व कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे. त्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, ईएसआय (ESI), आरोग्य सुविधा आणि वार्षिक वैद्यकीय तपासणी देण्यात यावी.

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या सुमारे साडेतीन हजार सभासद कर्मचाऱ्यांच्या वतीने “समान काम, समान वेतन” आणि सेवेत कायम करण्यासाठी आधीच न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रशासनाने केवळ पंचनामे आणि पाहणीचा फार्स न करता १५ दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढावा, अन्यथा पिंपरी-चिंचवडमधील कचरा कोंडी करत महापालिकेला टाळे ठोकू, असा इशारा भोसले यांनी दिल्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!