मोशी दुर्घटना : चौथ्या दिवशी अखेर ‘त्या’ निष्पापांचे मृतदेह हाती; ७ जणांचा मृत्यू, मृतांची एकूण संख्या ८ वर! एकाचा अद्यापही युद्धपातळीवर शोध सुरू
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या मोशी कचरा डेपो येथील भीषण दुर्घटनेच्या चौथ्या दिवशी अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी माहिती समोर आली आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या ढिगाऱ्याखाली आणि दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या अथक शोधमोहिमेदरम्यान काल ७ जणांचे मृतदेह हाती आले आहेत. त्यामुळे या भीषण आपत्तीतील एकूण मृतांची संख्या आता ८ वर पोहोचली असून संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. तर, कचऱ्याच्या ढिगाखाली गाडला गेलेल्या आणखी एका नागरिकाचा अद्यापही शोध लागलेला नसून यंत्रणेमार्फत युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन सुरू आहे.
मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ठीक दीड वाजेच्या सुमारास कचऱ्याचा अवाढव्य डोंगर अचानक ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या दुर्दैवी घटनेत इमारतीमध्ये २२ आणि इमारतीच्या शेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाखाली १ असे एकूण २३ नागरिक गाडले गेले होते.

दुर्घटनेच्या पहिल्याच दिवशी इमारतीमधून ५ नागरिक स्वतःहून सुखरूप बाहेर पडले. त्यानंतर भारतीय सेना (Indian Army), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीएचे अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. पहिल्याच दिवशी इमारतीमध्ये अडकलेल्या ९ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले होते. त्यानंतर उर्वरित बेपत्ता नागरिकांसाठी अहोरात्र सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले.
९ जुलै रोजी भावेश वाणी या नागरिकाला इमारतीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते, हा या
दुर्घटनेतील पहिला बळी होता. त्यानंतर उर्वरित नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी दुर्घटनाग्रस्त इमारतीत प्रवेश करणे अत्यंत आवश्यक होते. मात्र, सततचा पाऊस, साचलेला कचऱ्याचा मलबा आणि इमारत प्रचंड धोकादायक व अस्थिर झाल्यामुळे आत जाण्याचा मार्ग तयार करण्यात मोठे तांत्रिक अडथळे येत होते.
हा मलब्याचा विळखा तोडण्यासाठी प्रशासनाने १२ पोकलेन, डंपर आणि जेसीबी मशीनचा वापर करून अविरत काम सुरू ठेवले. काल रात्री इमारतीचा धोकादायक व अस्थिर काँक्रिट भाग हटवण्यासाठी दोन अत्याधुनिक ‘डिमोलीशन एक्सकॅव्हेटर’ मशिन्स घटनास्थळी आणण्यात आल्या. एनडीआरएफच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली इमारतीचा धोकादायक भाग नियंत्रित पद्धतीने पाडल्यानंतर अखेर बचाव पथकाला इमारतीमध्ये प्रवेश मिळाला.
इमारतीच्या आत प्रवेश केल्यानंतर दिवसभर चाललेल्या अत्यंत क्लेशदायक शोधमोहिमेत ७ नागरिकांचे मृतदेह हाती आले. मृतांची नावे १. अक्षय सावंत (वय ३५ वर्ष, रा. मोशी), २. सुनील कोरके (वय ४० वर्ष, रा. आळंदी), ३. सन्नी माने (वय ३९ वर्ष, रा. गंधर्वनगरी, मोशी)m ४. महेश कुंभार (वय ३३ वर्ष, रा. छत्रपती संभाजीनगर), ५. नागेश गायकवाड (वय २६ वर्ष, रा. संजय गांधी नगर, मोशी), ६. रणजीत पाटील (वय २२ वर्ष, रा. मोशी), ७. राहुल गायकवाड (वय ३५ वर्ष, रा. मोशी) आहेत.
या सर्वांना इमारतीबाहेर काढून तातडीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी तपासणीअखेर या सर्वांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. एकाच वेळी ७ तरुणांचे मृतदेह बाहेर आल्यामुळे नातेवाइकांनी रुग्णालयात केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
इमारतीमधील सर्वांचा शोध लागला असला, तरी पहिल्या दिवसापासून इमारतीशेजारी असलेल्या कचऱ्याच्या महाकाय ढिगाखाली अडकलेल्या एका नागरिकाचा शोध अद्याप लागलेला नाही. या शेवटच्या नागरिकाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या विशेष श्वान पथकाची (Dog Squad) मदत घेतली जात आहे. वेगवेगळ्या अत्याधुनिक तांत्रिक यंत्रणांचा वापर करून ही शोधमोहीम अविरतपणे सुरूच राहणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

