विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नको; मोशी-गुरुकुलम् परिसरातील अतिवृष्टीच्या नुकसानीची महापौर रवि लांडगे यांच्याकडून थेट पाहणी; कायमस्वरूपी उपाययोजनांचे प्रशासनाला कडक निर्देश
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान, १२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: “विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील आणि सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या कोणत्याही अडचणींचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अथवा त्यांच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर परिणाम होणार नाही, याची महापालिका प्रशासनाने चोख दक्षता घेतली पाहिजे. शाळा आणि शैक्षणिक संकुलांच्या परिसरात तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार आणि कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने पूर्ण करा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही,” असा कडक आणि स्पष्ट इशारा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.
क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् तसेच क्रांतिवीर चाफेकर प्राथमिक विद्यामंदिर येथे मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर, आज रविवारी (१२ जुलै) महापौर रवि लांडगे यांनी संपूर्ण प्रशासकीय लवाजम्यासह या दोन्ही शाळांच्या परिसराची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
पाहणी दौऱ्यादरम्यान महापौर रवि लांडगे यांनी संपूर्ण शैक्षणिक इमारतीचा परिसर, मुसळधार पावसामुळे बाधित झालेली विविध ठिकाणे, पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था, शाळेच्या संरक्षक भिंतीलगतचा परिसर तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वावराच्या मुख्य जागांची अतिशय बारकाईने पाहणी केली. शहरात व परिसरात सुरू असलेल्या पावसाचे गांभीर्य लक्षात घेऊन, भविष्यात कोणतीही लहान-मोठी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी महापौरांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले. केवळ कागदोपत्री काम न करता, आवश्यकतेनुसार तांत्रिक विभागाची मदत घेऊन दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने आणि सुरळीत होण्यासाठी परिसरातील ड्रेनेज तसेच स्टॉर्म वॉटर लाईनची तातडीने स्वच्छता व तपासणी करावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बांधकाम व संरचनात्मक (Structural) भागांची महापालिकेच्या सक्षम तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत तातडीने पाहणी करून घ्यावी.ज्या ठिकाणी पाणी साचते किंवा जो भाग असुरक्षित वाटतो, तिथे तातडीने बॅरिकेडिंग करून प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात.संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी संस्थेच्या प्रतिनिधींशी दैनंदिन समन्वय साधून झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घ्यावा. कामांचे प्राधान्यक्रम निश्चित करून तातडीने कामाला सुरुवात करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा.
महापौरांच्या या धडक पाहणी दौऱ्याच्या वेळी माजी नगरसदस्य सुरेश भोईर, क्षेत्रीय अधिकारी गोरख लिमन, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मुठाळ, आरोग्य निरीक्षक महेश जगताप यांच्यासह महापालिकेचे संबंधित विभागाचे कनिष्ठ अभियंता, कर्मचारी आणि चाफेकर स्मारक समिती व गुरुकुलम् संस्थेचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
महापौरांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि प्रशासनाला दिलेल्या कडक सूचनांमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये सुरक्षिततेबाबत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


