मोशी कचरा डेपो दुर्घटना ‘मानवनिर्मित की नैसर्गिक’? संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम यांचा सत्ताधारी भाजप व प्रशासनावर थेट हल्लाबोल; ‘एसआयटी’ चौकशीसह सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची केली आक्रमक मागणी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्रात घडलेली भीषण दुर्घटना ही नैसर्गिक आपत्ती नसून सत्ताधारी भाजप नेते आणि महापालिका प्रशासनाच्या प्रचंड दुर्लक्षितपणामुळे घडलेला मानवनिर्मित नरसंहार आहे, असा घणाघाती आरोप संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री. प्रवीण कदम यांनी केला आहे. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील जनभावना तीव्र झाल्या असताना, प्रवीण कदम यांनी अत्यंत आक्रमकपणे जनतेचा आणि पीडित कामगारांचा आवाज उठवत थेट आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.
“गरीब कामगारांचे जीव ढिगाऱ्याखाली गुदमरत असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि आयुक्त सोयीस्करपणे आनंद साजरा करण्यात व्यस्त होते,” असा खळबळजनक आरोप करत प्रवीण कदम यांनी या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथकाद्वारे (SIT) चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या जनहितैषी आणि तडफदार भूमिकेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये कामगार आणि सर्वसामान्यांचे हक्क जपणारे एक प्रगल्भ आणि धाडसी नेतृत्व म्हणून प्रवीण कदम यांची प्रतिष्ठा प्रचंड उंचावली आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शहराध्यक्ष प्रवीण कदम यांनी प्रशासकीय नाकर्तेपणाचे वाभाडे काढत अत्यंत धारदार प्रश्न उपस्थित केले आहेत. ८ जुलै रोजी दुपारी एक वाजता कचऱ्याचा ढीग कोसळला असताना तात्काळ बचाव कार्यात तत्परता का दाखवली नाही? सुरुवातीचे दोन दिवस ढीग कोसळत असतानाही प्रशासन ढिम्म का राहिले? दुर्घटनाग्रस्त इमारतीचा काँक्रीट भाग फोडण्यासाठी आवश्यक असलेली ‘डीमोलिशन एक्सकेव्हेटर मशीन’ आणायला ४८ तास (दोन दिवस) एवढा मोठा विलंब का लागला? कामगारांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक ‘लेब्राडॉर टेक्निक’ (श्वान पथक) पहिल्याच दिवशी का वापरली नाही? कचऱ्यातील मिथेन वायू आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एनडीआरएफच्या (NDRF) जवानांना श्वास घेणे जिकरीचे झाले होते, त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कोणतीही तातडीची उपाययोजना का केली नाही?
प्रवीण कदम यांनी शहरातील राजकीय नेत्यांच्या संवेदनशून्यतेवर अत्यंत कडक शब्दांत प्रहार केला आहे. ते म्हणाले,
“काळजाचा थरकाप उडवणारी एवढी मोठी दुर्घटना मोशीमध्ये घडली असताना, भारतीय जनता पार्टीचे मोशी, भोसरी, इंद्रायणी नगर, चऱ्होली भागातील सत्ताधारी आमदार आणि नगरसेवक लोक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. तर दुसरीकडे, शहराचे आयुक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये फुगडी खेळून आनंद साजरा करत होते. गरिबांच्या आणि कामगारांच्या जिवाची तुम्हाला साधी कीवही आली नाही का? तुम्हाला त्यांच्या जिवाची काहीच काळजी नाही का?”
महापालिकेच्या अंतर्गत भ्रष्टाचारावर बोट ठेवताना प्रवीण कदम यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि कायदेशीर मुद्दा उपस्थित केला आहे. मोशी कचरा डेपोच्या शेजारी असलेली महापालिकेची तीन मजली कार्यालयीन इमारत अधिकृत आहे की अनाधिकृत, असा सवाल त्यांनी केला. “केवळ एका मजल्याची परवानगी असताना ही तीन मजली इमारत उभी राहिलीच कशी?” असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. तसेच, तीन मजली इमारत आणि कचऱ्याचा डोंगर यामध्ये कायदेशीर नियमांनुसार ३० मीटरचे अंतर असणे आवश्यक असताना, केवळ एक गाडी जाऊ शकेल एवढा रस्ता अरुंद कसा झाला? यावरून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे साटंलोटं स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, कचरा डेपोच्या प्रवेशद्वारापासून ते कार्यालय परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेज जप्त करून या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
“क्षमता संपलेली असतानाही शासनाचे नियम धाब्यावर ठेवून कचऱ्याचा डोंगर केला गेला आणि कामगारांच्या जिवाशी खेळ खेळला गेला. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्या तात्काळ निलंबित करावे आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा. या घटनेत कोणालाही पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून होत असेल, तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि होणाऱ्या परिणामास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल!”
कामगारांच्या मृत्यूचे भांडवल न करता थेट व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवून न्यायाची भूमिका घेणाऱ्या प्रवीण कदम यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून, कामगार वर्गातून कदम यांच्या नेतृत्वाला मोठा पाठिंबा मिळत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

