आशिष राऊत यांची पिंपरी उपबाजार विभाग प्रमुख पदी नियुक्ती; ‘पिंपरी फुलबाजार आधुनिक व सुविधायुक्त करणार’ – पदभार स्वीकारताच व्यक्त केला संकल्प
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , १७ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील शेतकरी व व्यापार्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अंतर्गत ‘उपबाजार पिंपरी’च्या विभाग प्रमुख पदी आशिष जयप्रकाश राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राऊत यांनी नुकताच आपल्या या नवीन पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या निवडीबद्दल कृषी आणि व्यापारी वर्गातून त्यांचे मोठे स्वागत केले जात आहे.
आशिष राऊत हे मागील काही वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे कार्यरत असून, त्यांना बाजार समितीच्या विविध विभागांमधील कामाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत भाजीपाला गटप्रमुख, केळी बाजार विभाग प्रमुख अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या याच उत्कृष्ट कामाची दखल घेऊन आता त्यांच्यावर पिंपरी उपबाजार गटप्रमुख पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पुढील ध्येयांबद्दल बोलताना आशिष राऊत म्हणाले, “पिंपरीचा फुलबाजार हा अतिशय मध्यवर्ती ठिकाणी असून अत्यंत कमी कालावधीत त्याने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. या बाजाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. हा फुलबाजार आणखी कसा वाढवता येईल आणि येथे माल आणणाऱ्या शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त चांगला भाव कसा मिळवून देता येईल, यावर माझा मुख्य भर असेल.”
ते पुढे म्हणाले की, “पुण्याच्या मार्केटयार्डपेक्षा पिंपरीचा फुलबाजार भौगोलिकदृष्ट्या अनेकांसाठी अधिक सोयीचा आहे. येथे रेल्वे, मेट्रो आणि बसची उत्तम कनेक्टिव्हिटी असल्यामुळे, पुण्याच्या धर्तीवर पिंपरीत एक भव्य आणि अत्याधुनिक फुलबाजार विकसित करण्यासाठी आपण विशेष प्रयत्नशील राहू.”
पिंपरी उपबाझारात मावळ, मुळशी, खेड, राजगुरूनगर आणि मंचर या ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपला शेतमाल व फुले घेऊन येत असतात. या सर्व शेतकरी बांधवांना पिंपरी उपबाजार आवारात जास्तीत जास्त चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
“बाजार आवारात येणारे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक यांना भेडसावणार्या स्थानिक समस्यांचे तातडीने निराकरण करण्याला माझे पहिले प्राधान्य राहील. सर्वांशी समन्वय साधून पिंपरी उपबाझाराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या या आश्वासक भूमिकेमुळे पिंपरी बाजारातील व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
