news
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला वेग; उपआयुक्त सचिन पवार यांच्या पारदर्शक नियोजनाची चर्चालिथुआनियात ‘अकोला बायोएनर्जी’चा बायोमिथेन प्रकल्प कार्यरत; युरोपीय गॅस ट्रान्समिशन नेटवर्कला मिळणार इंधनपिंपळे सौदागर गावठाण कॉर्नरवरील तुटलेल्या चेंबरमुळे वाहनधारक त्रस्त; पिंपरी-चिंचवड पालिकेच्या भोंगळ कारभारावर संतापNEET पेपरफुटी आंदोलन; पोलिसांच्या लाठीमाराविरोधातील तातडीची याचिका सर्वोच्च अन् दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळलीNEET पेपरफुटी अन् २२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी अण्णा हजारे संतप्त; पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे सुनावले
Home अमरावती शिक्षणाचा बाजार अन् हुंड्याची सुसंस्कृत पिळवणूक; उच्चशिक्षितांच्या आचरणातील विरोधाभासावर प्रहार

शिक्षणाचा बाजार अन् हुंड्याची सुसंस्कृत पिळवणूक; उच्चशिक्षितांच्या आचरणातील विरोधाभासावर प्रहार

हुंडाबंदीवर फक्त भाषणे नकोत, तर कृतीची गरज; स्वतःपासून सुरुवात करण्याचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

हुंड्याचे समाजशास्त्र’: उच्चशिक्षित झालात; पण विचार बदलले का? — प्राध्यापक व उच्चशिक्षितांच्या दुटप्पीपणावर बोट ठेवणारा विशेष लेख

 

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन २३ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

अमरावती: भारतीय समाजाने विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि आर्थिक विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. मुली आज शिक्षण, प्रशासन, न्यायव्यवस्था, संशोधन, उद्योग, राजकारण, संरक्षण, समाजकार्य आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. स्त्री-पुरुष समानता, महिला सक्षमीकरण आणि मानवी हक्क यांवर आज मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. विद्यापीठांमध्ये समाजशास्त्र, समाजकार्य, लिंगभाव आणि स्त्री अभ्यास शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र आणि मानव विज्ञान विद्याशाखेतील मराठी, इतिहास, अर्थशास्त्र यांसारख्या विषयांमधून मानवी मूल्य, समानता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचे शिक्षण दिले जाते.

परंतु या सर्व प्रगतीच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न आजही अस्वस्थ करतो. उच्चशिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली असूनही उच्चशिक्षितांमध्ये विवाहाच्या वेळी हुंडा घेण्याची प्रथा का टिकून आहे? शिक्षण वाढले, पदव्या वाढल्या, पगार वाढले, प्रतिष्ठा वाढली; पण विचार खरोखर बदलले का?

समाजशास्त्राच्या दृष्टीने हुंडा हा केवळ विवाहाच्या वेळी होणारा आर्थिक व्यवहार नाही. तो पितृसत्ताक सामाजिक रचना, स्त्रीविषयीची दुय्यम मानसिकता, सामाजिक प्रतिष्ठेची स्पर्धा, आर्थिक विषमता आणि परंपरेच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायाचे प्रतीक आहे. समाज ज्या मूल्यांना मान्यता देतो, त्या मूल्यांच्या आधारेच अशा प्रथा टिकून राहतात.

सामाजिक कार्य करत असताना माझी सुरुवातीची समजूत अशी होती की हुंडा ही समस्या मुख्यतः अशिक्षित किंवा ग्रामीण समाजात अधिक असेल. परंतु प्रत्यक्ष अनुभव, विविध प्रकरणांचे निरीक्षण आणि सामाजिक वास्तवाचा अभ्यास करताना लक्षात आले की अनेक वेळा उच्चशिक्षित समाजातही हुंड्याचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. फरक इतकाच की ते अधिक सुसंस्कृत भाषेत आणि प्रतिष्ठेच्या आवरणाखाली केले जातात.
आज ‘ हुंडा ‘ हा शब्द कमी वापरला जातो; त्याऐवजी ‘ भेट ‘ ‘ मुलीच्या भवितव्यासाठी ‘ , ‘लग्नातील सहकार्य ‘,  गिफ्ट ‘, फर्निचर ‘, ‘वाहन ‘,  फ्लॅट ‘ किंवा  ‘लग्नाचा खर्च ‘ अशा नावांनी नव्या रूपातील हुंड्याचे  समर्थन केले जाते. हुंड्याचे नाव बदलले, पण व्यवहार बदललेला नाही.

यातील सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे समाजशास्त्र, समाजकार्य, शिक्षणशास्त्र किंवा मानसशास्त्र, मराठी, इतिहास, अर्थशास्त्र, विधी यांसारख्या मानवविज्ञान यांसारख्या विषयांचे शिक्षण घेणाऱ्या किंवा तेच विषय महाविद्यालयात शिकवणाऱ्या काही व्यक्ती स्वतःच्या विवाहाच्या वेळी लाखो रुपयांचा हुंडा स्वीकारतात.

सामाजिक शास्त्रांमध्ये हुंडा विरोधी आंदोलन, महिला सक्षमीकरण,  सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, मानवी हक्क आणि हुंडाबंदी शिकतात आणि शिकवतात.  समानता यावर काथ्याकूट करतात.   विविध न्यायाच्या सिद्धांतांचा अभ्यास करतात. पण स्वतःच्या आयुष्यात त्याच मूल्यांना हरताळ फासायचा. हा विरोधाभास केवळ वैयक्तिक नाही; तो शिक्षणव्यवस्थेलाच प्रश्न विचारणारा आहे.

अनेकदा नोकरी, व्यवसायासाठी लागणाऱ्या पैसे प्राप्त करण्यासाठी अनेक उच्चशिक्षित लोक विवाहाच्या वेळी मुलीकडून  हुंडा घेण्यासाठी सल्ला देतात.  असा सल्ला देण्यात उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ महिलासुद्धा मागे नसतात. प्रत्यक्ष हुंडा घेण्याच्या आणि हुंड्या घेण्यासाठी सामाजिक मान्यता घडवणाऱ्या अशा घटना अपवादात्मक नाहीत.

अनेक ठिकाणी सरकारी अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, अभियंते, वकील किंवा इतर प्रतिष्ठित नोकरी करणाऱ्या युवकांचा लग्नाच्या बाजारात जणू “भाव” ठरवला जातो. सरकारी नोकरी म्हणजे इतका हुंडा, परदेशात नोकरी म्हणजे त्याहून अधिक, असे अलिखित दर समाजात फिरताना दिसतात.

महात्मा जोतीराव फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महामानवांच्या अथक संघर्षामुळे आज समाजात अनेकांना संधी प्राप्त झाली. आज असंख्य मुले सामाजिक न्यायाच्या अंतर्गत स्थापन वसतिगृहांमध्ये, शिष्यवृत्यांवर शिक्षण पूर्ण करतात. संशोधने पूर्ण करतात. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी लागणार असली किंवा लागली की प्रचंड हुंडा घेतात. ज्या सामाजिक न्यायाच्या धोरणातून त्यांना शिक्षणाची संधी मिळाली, त्याला विसरून हुंडा घेणारे असे लोक लैंगिक असमानता पाळतात. विषमतेचे मूल्य जोपासतात.

आज मुलाचे शिक्षण आणि नोकरी ही त्याची गुणवत्ता न राहता आर्थिक व्यवहाराचे साधन बनते. त्यांच्या शिक्षणासाठी झालेला खर्च आणि दिलेला वेळ व श्रम हा हुंड्याच्या माध्यमातून वसूल करण्यावर भर देण्यात येतो. याचा सर्वाधिक फटका मुलींच्या कुटुंबाला बसतो. अनेक पालक मुलीच्या विवाहासाठी कर्ज काढतात, शेती विकतात. आयुष्यभराची बचत खर्च करतात किंवा निवृत्तीचे पैसे वापरतात. काही कुटुंबे आर्थिक संकटात सापडतात.

विवाहानंतरही मागण्या थांबत नाहीत. मानसिक छळ, शारीरिक अत्याचार, आत्महत्या किंवा संशयास्पद मृत्यूच्या घटना आजही घडतात. त्यामुळे हुंडा हा केवळ विवाहाचा विषय नाही; तो महिलांच्या मानवी हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे.
समाजशास्त्रात ‘ज्ञान आणि आचरणातील सुसंगती’ हे महत्त्वाचे मूल्य मानले जाते. शिक्षक, प्राध्यापक आणि समाजपरिवर्तनाची भाषा बोलणाऱ्या व्यक्तींकडून समाजाला अधिक अपेक्षा असतात. म्हणूनच जेव्हा अनेकजण मानव विज्ञान आणि विविध विद्याशाखेतील विषय जसे समाजशास्त्र, समाजकार्य, मराठी, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विधी यांसारखे विषयांचे शिक्षण घेतात किंवा ते शिकवतात. त्यांमध्ये संशोधन करतात, त्या आधारे खाजगी आणि शासकीय नोकऱ्या प्राप्त करतात, व्यवसाय करतात. तेव्हा त्यांमध्ये काही मानवी मूल्ये रुजली की नाही असा प्रश्न पडतो.

विज्ञान – तंत्रज्ञान यांसारख्या विषयांचे शिक्षण घेतलेले अनेक उच्चशिक्षित सुद्धा आपल्या जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोन न स्वीकारता हुंड्यासारख्या अमानुष परंपरेचे स्वतःच्या स्वार्थासाठी पालन करतात. रूढीवादाचे समर्थन करतात. उच्चशिक्षित व्यक्ती जी कोणत्याही विषयात शिक्षण घेतलेली असो ती व्यवहारात हुंडा घेण्याची कृती करीत असेल तर ती निश्चितच आदरास पात्र होऊ शकत नाही. कारण अशी व्यक्ती सामाजिक शास्त्र आणि विज्ञानाचे कितीही ज्ञान प्राप्त केलेली असो तिचा व्यवहार हा विषमतेचा असेल तर ती उपेक्षेस पात्र आहे.

आज हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. परंतु कायद्याची भीती पुरेशी नाही. समाजातील नैतिकता, वैचारिक प्रामाणिकता आणि वैयक्तिक आचरण बदलल्याशिवाय ही प्रथा पूर्णपणे नष्ट होणार नाही. या लेखाचा उद्देश कोणत्याही व्यवसायाची किंवा संपूर्ण उच्चशिक्षित वर्गाची बदनामी करणे नाही. आजही हुंडामुक्त विवाह करून आदर्श निर्माण करत आहेत. त्यांचा सन्मानच झाला पाहिजे. परंतु ज्या ठिकाणी विचार आणि कृती यांच्यात विसंगती आहे, त्या विसंगतीकडे लक्ष वेधणे ही सामाजिक जबाबदारी आहे.

आज गरज आहे ती हुंडाबंदीवर भाषणे देणाऱ्यांची नव्हे, तर स्वतःच्या कृतीतून हुंडामुक्त समाज घडवणाऱ्या व्यक्तींची. यामध्ये सर्वात प्रथम उच्चशिक्षित तरुणांनी स्वतःच्या आयुष्यात त्या मूल्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. कारण विचारांना कृतीची जोड मिळाली तरच समाज बदलतो; अन्यथा विचार हे केवळ व्याख्यानांमध्ये, परिषदांमध्ये, संशोधनात आणि पुस्तकांमध्येच अडकून राहतात.
हुंड्याचे समाजशास्त्र आपल्याला एकच धडा शिकवते—समाज बदलायचा असेल, तर सुरुवात स्वतःपासून करावी लागते.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!