‘तारपा’ हेच आमचे जीवन अन् वंशावळ; रुद्रांग वाद्यपथकाकडून पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांचा भव्य सन्मान!
पुणे/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे दि. २७ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे : “आमचे पणजोबा नवश्या, आजोबा धाकल्या हे तारपा वाद्य वाजवायचे. त्यानंतर धाकल्याचा मुलगा लाडक्या, आणि लाडक्याचा मुलगा मी, भिकल्या आज तारपा वाजवतो. ‘तारपा‘ हे केवळ वाद्य नसून आमची वंशावळ आहे. आता माझा नातू आणि पणतू हे वाद्य शिकत आहेत. मी त्यांच्यासोबतच साठ-सत्तर लोकांना हे वाद्य शिकवले आहे,” अशी अत्यंत भावुक आणि सार्थ अभिमानाची भावना प्रसिद्ध पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांनी व्यक्त केली.
रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्ती निमित्त आयोजित भव्य वाद्यपूजन सोहळ्यात पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. “देवाने आपल्याला जन्म दिला आहे. मनाला विचारून आपण विचार करायचा असतो आणि विचारांनी आचार केला, तरच विकास होतो,” असा महत्त्वपूर्ण संदेशही त्यांनी यावेळी दिला.
पुण्याच्या गणेशोत्सवाची ख्याती जगभर पसरली असून ढोल-ताशा ही पुण्याची खास संस्कृती आहे. रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्ती निमित्त एका वादक संस्कृतीकडून दुसऱ्या पारंपरिक वादक संस्कृतीचा सन्मान व्हावा, या उदात्त उद्देशाने पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांचा सत्कार करण्यात आला, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अमर भालेराव यांनी दिली.
या कार्यक्रमा प्रसंगी आमदार हेमंत रासने, दिपकभाऊ नागपुरे, नगरसेवक राजेंद्र काकडे, नगरसेवक अपूर्व खाडे, नगरसेविका पुजा जागडे, अभिनेते रमेश परदेशी (पिट्याभाई), नितीन पंडीत, आशिष कांटे, देवेंद्र वडके, अमित पळसकर, शिरीष थिटे, गणेश देशपांडे, मयुर ढमाले यांच्यासह शहरातील विविध वाद्यपथकांचे व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तारपा वाद्याचे वैशिष्ट्य सांगताना भिकल्या धिंडा म्हणाले, “आमचा तारपा देवासाठी वाजतो, हे देवकार्याचे वाद्य आहे. हे वाद्य श्वासाने वाजते. जसा वारा आल्यावर झाड हलते, तसा तारप्याला श्वास दिला की ते वाजते. माडाचे पान, दोन बांबू आणि त्याला दुधी भोपळा जोडून हे वाद्य बनवले जाते. तारप्यात नर आणि मादी अशा दोन नलिका असतात. शरीराला जेवढा श्वास लागतो, तेवढा श्वास या दोन्हींमध्ये भरावा लागतो.”
यावेळी बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, “गणेशोत्सवाला १३५ वर्षांची भव्य परंपरा आहे. पूर्वी कार्यकर्ते स्वतः मंडप आणि सजावट करायचे. काळानुसार बदल होत गेले असले, तरी गणेशोत्सवाने कायम धर्म, संस्कृती आणि परंपरा जपण्याचे काम केले आहे.”
या कार्यक्रमात अध्यक्ष अमर भालेराव यांनी ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इन्स्टाग्राम रील’ स्पर्धेची माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष अमर भालेराव, श्रीनिवास निगडे, अमोल शुक्ल, तुषार दामगुडे, अमित घुले, निलेश वावरे यांनी केले असून, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांचे या कार्यक्रमास विशेष मार्गदर्शन लाभले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
